(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकरांनी मैदान बदलले; खानापूर-आटपाडीतून जत विधानसभेकडे मोर्चा वळवला
माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभेला पक्षविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे जत तालुक्यात भाजपकडे सध्या सर्व समाजाला एकसंध ठेवून कार्य करणारा मोठा नेता नाही.
Gopichand Padalkar : भाजपचे विधान परिषदेचेआमदार गोपीचंद पडळकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालविली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना तयारीच्या सूचना दिल्याचेही बोलले जात आहे. मात्र, होम पिच असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून ऐवजी जतमधून लढणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पडळकर आजपासून (1 जून) जत तालुक्याचा दौरा करत आहेत. जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप स्टार प्रचारक असलेले गोपीचंद पडळकर विधान परिषदेचे सदस्य आहेत.
खानापूर-आटपाडी मतदारसंघात पडळकर काय भूमिका घेणार?
जत विधानसभा मतदारसंघात धनगर, लिंगायत व बहुजन समाजाची संख्या मोठी आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभेला पक्षविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे जत तालुक्यात भाजपकडे सध्या सर्व समाजाला एकसंध ठेवून कार्य करणारा मोठा नेता नाही. त्यामुळे जतमधून विधानसभा लढण्यासाठी भाजपकडून पडळकर यांची तयारी सुरू आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून होम पिच असलेल्या खानापूर-आटपाडी मतदारसंघाबाबत पडळकर काय भूमिका घेणार? हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
महायुती झाल्यास नेमका मतदारसंघ कोणाला मिळणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. शिंदे गटाकडे मतदारसंघ कायम राहिल्यास पडळकर यांची भूमिका कोणती राहणार? हेही स्पष्ट नाही. दिवंगत आमदार अनिल बाबर व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. 2019 च्या निवडणुकीत बाबर यांच्या विजयात पडळकरांनी मोठे योगदान दिले होते. मात्र, यानंतर 2019 ची चूक सुधारणार असल्याचे त्यांनी जाहीररित्या अनेक कार्यक्रमामध्ये बोलून दाखवले आहे. आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर मतदारसंघातील परिस्थिती बदलली असली, तरी शिंदेसेना पुन्हा मतदारसंघावर दावा करत अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना मैदानात उतरवणार हे जवळपास निश्चित आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या वैभव पाटील यांनीही तयारी सुरू केली आहे. गोपीचंद पडळकर जर जतमधून लढणार असतील तर त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर खानापुरातून लढण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी आतापासूनच संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. भेटीगाठीचे कार्यक्रमही सुरु ठेवले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या