Sangli Fire : सांगलीत वनविभागाच्या गोदामाला भीषण आग, लाखो रुपयांच्या औषधी वनस्पती जळून खाक
Sangli Fire : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणावतीमध्ये असलेल्या वनविभागाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटा घडली आहे.
Sangli Fire News : सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणावतीमध्ये (Waranawati) वन्यजीव कार्यालयाच्या शेजारी असलेल्या गोदामाला आग (Fire breaks godown) लागल्याची घटना घडली. यामध्ये वनविभागाच्या ताब्यातील लाखो रुपयांच्या नरक्या ( औषधी वनस्पती) आगीत जळून खाक झाल्या आहेत. या आगीत वीस वर्षांपूर्वी जप्त केलेला मुद्देमाल जळाला आहे. तसेच दोन ट्रक देखील जळून खाक झाल्या आहेत.
कॅन्सरच्या उपचारासाठी नरक्या वनस्पतीचा वापर
नरक्या म्हणजे औषधी वनस्पती असून, नरक्या वनस्पतीचा सर्वसाधारणपणे कॅन्सरच्या उपचारासाठी बनवल्या जाणाऱ्या काही औषधांमध्ये वापर होत असतो. पश्चिम घाटात विविध ठिकाणी नरक्या वनस्पती आढळते. नरक्या वनस्पतीची तोडीणी करण्यावर कायद्याने बंदी आहे. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी दहा वनमजूर आणि वनपाल यांच्यासह ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशामन दलाची गाडी देखील घटनास्थळावर दाखल झाली आहे. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. वन्यजीव विभागाचे कोणीही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर हजर झाले नव्हते.
नरक्या वनस्पतीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच आग
सुमारे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी येथे नरक्या तस्करीचे प्रकरण उघड झाले होते. यामध्ये नरक्या वनस्पतीच्या तीन ट्रक जप्त करण्यात आल्या होत्या. जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल हा वन्यजीव कार्यालयाच्या ताब्यात होता. हा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल वन्यजीव कार्यालयाच्या शेजारील गोदामात ठेवण्यात आला होता. तस्करीच्या नरक्याचे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच, विशेषतः हा मुद्देमाल वन्यजीव कार्यालयाच्या ताब्यात असतानाच ही आग लागल्याने सर्वसामान्यांमधून संशय व्यक्त केला जात आहे.
चांदोली उद्यानासह सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वनौषधी वनस्पतींचा मोठा ठेवा
सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या हद्दीवर 317 चौरस किलोमीटर क्षेत्रात चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि सध्याचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विस्तारला आहे. या परिसरात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे. जगातील सर्वाधिक वनौषधी वनस्पतींचा ठेवा इथे आहे. या परिसरामध्ये नरक्या ही वनस्पतीसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येते. राज्य सरकारनं या वनस्पतीची नोंद दुर्मिळ वनस्पती म्हणून केली आहे. नरक्या वनस्पतीच्या तोडीला कायद्याने बंदी आहे. खासगी कंपन्या आणि विदेशी बाजारपेठात कोट्यवधी रुपयांना ही वनस्पती विकली जाते. वनविभागाने या वनस्पतीचे संरक्षण करावे, असे शासनाचे स्पष्ट आदेश होते. अशातच वनविभागाच्या शेजारी असलेला नरक्या दिवसाढवळ्या जळून खाक झाल्या आहेत.
नरक्या म्हणजे औषधी वनस्पती
नरक्या वनस्पतीला शास्त्रीय भाषेत नोथापोडायटस निमोनियाना या नाव्याने ओळखले जाते. नरक्या वनस्पतीचा सर्वसाधारणपणे कॅन्सरच्या उपचारासाठी बनवल्या जाणाऱ्या काही औषधांत वापर होत असतो. पश्चिम घाटात विविध ठिकाणी नरक्या वनस्पती आढळते. नरक्या वनस्पतीच्या तोडीला कायद्याने बंदी आहे. कॅन्सरच्या रोगावर औषध बनवण्यासाठी या वनस्पतीच्या खोडापासून बनवलेल्या पावडरचा उपयोग केला जातो.
महत्त्वाच्या बातम्या: