Maharashtra Kesari 2023 : 'सिंकदर तयार, महेंद्र गायकवाडला कुस्तीसाठी तयार करा'; अंबाबाई तालीम संस्थेकडून वस्ताद काका पवारांना पत्र
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निकालापेक्षा सिकंदर शेखवर अन्याय झाल्याची भावना सोशल मीडियातून तसेच समर्थकांतून होत असल्याने वाद चांगलाच पेटला आहे. सिकंदरला कमी गुण दिल्याचा आरोप होत आहे.
Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निकालापेक्षा सिकंदर शेखवर (Sikandar shaikh) अन्याय झाल्याची भावना सोशल मीडियातून तसेच समर्थकांतून होत असल्याने वाद चांगलाच पेटला आहे. पुण्यात रंगलेल्या महाराष्ट्र केसरीच्या लढतीत सिकंदरला कमी गुण दिल्याचा आरोप होत आहे.
त्यामुळे या वादावर पडदा टाकण्यासाठी सांगली- मिरज मधील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी पुढाकार घेतला आहे. सिकंदरने मला फोन करून तयारी दर्शविली आहे. आपणही महेंद्रला तयार करून मान्यता दिल्यास श्री अंबाबाई तालीम संस्था कुस्तीची तारीख निश्चित करेल. जिंकणाऱ्या पैलवानास "महाराष्ट्र केसरी" सामन्यात ज्या पध्दतीने, चांदीची गदा दिली जाते तशीच “गदा" संस्थेमार्फत देऊन यथायोग्य रोख रक्कम देण्याचा मानस संस्थेचा आहे, तरी मान्यता कळवावी, अशी विनंती वस्ताद काका पवार यांना करण्यात आली आहे.
त्यांनी सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये मातीतील निकाली कुस्ती मैदान अंबाबाई तालीम संस्थेच्या मैदानात घेण्याची तयारी दर्शवली आहे. या दोघांमध्ये झालेल्या कुस्तीमधील विजेत्याला महाराष्ट्र केसरीच्या तोलामोलाची चांदीची गदा देऊन आणि महाराष्ट्र महाकेसरीचा किताब देऊन गौरविण्यात येईल. या मैदानात सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांनी येऊन लढावं आणि सध्या सुरू असलेला वाद थांबवावा, अशी भूमिका शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे वस्ताद यांनी घेतली आहे.
कोण बरोबर कोण चूक ही चर्चा थांबवून खिलाडूवृत्तीने महेंद्र व सिकंदर यांनी मातीमधील निकाली कुस्ती करावी व कुस्ती शौकिनांमधील संभ्रम दूर करावा, यासाठी सांगलीमध्ये या दोघांची कुस्ती व्हावी यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे संजय भोकरे यांनी म्हटले आहे.
माझ्यावर अन्याय झालेला महाराष्ट्रानं पाहिला
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती गटातील अंतिम लढतीत पैलवान सिकंदर शेखवर (Sikandar shaikh) अन्याय झाल्याचा जाब विचारल्याने मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांच्या विरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. परंतु, संग्राम कांबळे यांनी कोणालाही धमकी दिलेली नाही, असं पैलवान सिकंदर शेखने म्हटले आहे. माझ्यावर झालेला अन्याय संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला असल्याचे सिकंदरने म्हटले आहे.
वादाला सुरुवात कशी झाली?
सेमी फायनलमध्ये महेंद्रने पहिला गुण मिळवला आणि आघाडी घेतली. त्यानंतर सिंकदरनेही आक्रमकता दाखवत प्रतिडाव टाकला आणि 2 गुण मिळवले. सिकंदर 2-1 ने पुढे होता. मात्र, यानंतर महेंद्र गायकवाडने एक डाव टाकला आणि 4 गुण खिशात घातले. महेंद्रचा हाच बाहेरची टांग नावाचा डाव वादात भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावरून अजूनही याची चर्चा थांबलेली नाही.