Sangli : बोम्मईंचा थेट जत तालुक्यावर दावा, गावांनी केलेल्या एल्गारमुळे सरकारची सुद्धा अडचण! सांगलीत वर्षभरात काय घडलं?
Year Ender 2022 : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप करणाऱ्या सर्वाधिक घटना सरत्या सांगली जिल्ह्यात घडल्या. यानिमित्ताने आजवरच्या राज्य सरकारचे अपयशही दिसून आले.
Year Ender 2022 : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप करणाऱ्या सर्वाधिक घटना सरत्या सांगली जिल्ह्यात घडल्या. यानिमित्ताने आजवरच्या राज्य सरकारचे अपयशही दिसून आले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केल्यानंतर चांगलाच उद्रेक झाला. त्यानंतर तहानलेल्या गावांनी सुद्धा संताप व्यक्त करत कर्नाटकात जाण्याची भाषा केल्याने परिस्थिती आणखी चिघळली.
वर्षाच्या अखेरीस जत तालुक्यातील सीमावर्ती भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. यातूनच या भागातील गावे कर्नाटकात जाण्याची पुन्हा भाषा करू लागली. महाराष्ट्र सरकारने याची तत्काळ दखल घेत जत तालुक्यातील वंचित 67 गावांसाठी संजीवनी ठरणाऱ्या 1932 कोटी रुपयांच्या जत तालुका विस्तारीत म्हैशाळ उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. याआधी जत पूर्व भागासाठी सहा टीएमसी पाणी आरक्षित करून ठेवण्यात आलं आहे. आता नवीन वर्षात या योजनेचे काम सुरू होईल अशी सीमावर्ती भागातील लोकांची अपेक्षा आहे.
दुसरीकडे वर्ष संपण्यास एक दिवस बाकी असताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल तीनवेळा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. बँकेतील नोकर भरतीतील घोटाळा, कर्ज वाटपातील अनियमितता, बँकेच्या कामकाजातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत आज राज्य सरकारने आदेश देत राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
2022 सरत्या वर्षात सांगली जिल्ह्यात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
- शिराळा तालुक्यातील सोनाली नवांगुळ यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार
- साडे सहा सेमी मण्याच्या लांबीच्या द्राक्षाच्या नव्या जातीला मिळाला VSD Seedless नावाने पेटंट. तासगाव तालुक्यातील वडगावच्या विजय देसाई या द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांच्या प्रयत्नाला यश
- कवलापूरच्या पोतदार द्राक्ष उत्पादक बंधू शेतकऱ्यांची गोल्डन कामगिरी. सिद्ध गोल्डन नावाने द्राक्षाची नवीन जात शोधत केंद्र सरकारचे मिळवले पेटंट.
- सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकाला 100 वर्षे पूर्ण. यावेळी किर्लोस्कर यांच्या पोस्टाच्या पाकिट व तिकिटाचे अनावरण करण्यात आले.
- 15 फेब्रूवारी 1922 रोजी कुंडल रोड रेल्वे स्थानकावरून नाव बदलून किर्लोस्करवाडी नामकरण करण्यात आले.
- मिरजेत पाश्चिमात्य देशातील प्राचीन हार्प वाद्याची यंदा निर्मिती झाली
- देशी तंतुवाद्य सोबत पहिल्यांदा विदेशी असलेले हार्प तंतुवाद्य बनविण्याचा मिरजेतील कारागिरांना मिळाला बहुमान
- सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीवरची बंदी उठल्यानंतरची राज्यातील अधिकृत पहिली बैलगाडी शर्यत सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळेत पार पडेल.
- राज्यातील पहिली बैलगाडी शर्यत आपल्या गावात संपन्न होण्याचा मान नांगोळे गावातील ग्रामस्थांना मिळाला
इतर महत्वाच्या बातम्या