Jayant Patil vs Ajit Pawar: जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात थेट अजित पवारांचे लक्ष; राजकीय संघर्ष आणखी वाढणार!
राष्ट्रवादी एकसंध असतानाही अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष कधीही लपून राहिलेला नाही. त्यामुळे जयंत पाटील यांना खिंडीत पकडण्यासाठी प्रयत्न तर सुरु नाहीत ना? अशीही चर्चा आहे.
Jayant Patil vs Ajit Pawar: राष्ट्रवादी फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या अजित पवार गटाकडून आता ताकद वाढवण्यासाठी मंत्र्यांना राज्यातील जिल्हे विभागून देण्यात आले आहेत. यामध्ये अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगली (Sangli News) जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. अजित पवार यांनी स्वत:कडे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आणखी वाढत जाणार आहे. राष्ट्रवादी एकसंध असतानाही अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष कधीही लपून राहिलेला नाही. त्यामुळे जयंत पाटील यांना खिंडीत पकडण्यासाठी अजित पवार यांच्याकडून प्रयत्न तर सुरु नाहीत ना? अशीही चर्चा आहे.
कोणावर कोणती जबाबदारी?
- अजित पवार - पुणे, सातारा, सांगली व सोलापूर
- प्रफुल पटेल - भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती व नागपूर
- छगन भुजबळ - नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर
- दिलीप वळसे पाटील - अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा
- हसन मुश्रीफ - कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि अहमदनगर
- धनंजय मुंडे - बीड, परभणी, नांदेड, आणि जालना
- संजय बनसोडे - हिंगोली,लातूर आणि उस्मानाबाद
- आदिती तटकरे -रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर
- अनिल पाटील - जळगाव, धुळे आणि नंदुरबार
- धर्मारावबाबा आत्राम - गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ
सांगली जिल्ह्यावर जयंत पाटलांचे एकाहाती वर्चस्व
सांगली जिल्हा हा जयंत पाटलांचा बालेकिल्ला समजला जातो. जिल्ह्यातील सत्ता स्थानांवर त्यांच्याच गटाचे सर्वाधिक प्राबल्य आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर कमी अधिक प्रमाणात सर्वच जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले, पण सांगली राष्ट्रवादीमध्ये कोणताही धक्का पोहोचलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाकडून शरद पवारांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, जेव्हा अजित पवार गटाकडून शरद पवारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा जयंत पाटील यांना सोबत घेऊनच चर्चा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील अजित पवार गटात जाणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात जयंत पाटील यांनी भेट घेतल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र, जयंत पाटलांनी या सर्व चर्चांचे खंडन केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या