Sadashiv Lokhande : राम मंदिराबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास, सदाशिव लोखंडेंचं स्पष्टीकरण
Sadashiv Lokhande : माझ्या पराभवाचे कारण प्रभू श्रीराम लल्लाचे अयोध्येत बांधण्यात आलेले मंदिर आहे, असा दावा माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला होता. आता या वक्तव्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शिर्डी : माझ्या पराभवाचे कारण प्रभू श्रीराम लल्लाचे अयोध्येत बांधण्यात आलेले मंदिर (Ayodhya Ram Mandir) आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Constituency) रावणाला मानणारा आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यांना हे मंदिर रुचले नाही, असा दावा शिर्डीचे माजी खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी केला होता. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आता सदाशिव लोखंडे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे त्यांनी म्हटले आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना (Shiv Sena Shinde Camp) विरुद्ध ठाकरेंची शिवसेना (Shiv Sena Thackeray Camp), असा सामना रंगला होता. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा या मतदारसंघात पराभव झाला. तर ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांचा विजय झाला. सदाशिव लोखंडे यांचा पराभवाची विविध कारणे गेल्या काही दिवसांपासून समोर येत होती. त्यातच सदाशिव लोखंडे यांनी कर्जत (Karjat) येथे माध्यमांशी संवाद साधताना पराभवाचे कारण सांगितल्याने खळबळ उडाली.
सदाशिव लोखंडेंचे स्पष्टीकरण
राममंदिराच्या वक्तव्यावर सदाशिव लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. राम मंदिर बांधल्यामुळेच माझा पराभव झाला, असे माझे वक्तव्य काही टिव्ही वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात आले. परंतु राम मंदिर बांधल्यामुळे मुस्लिम मतांचे झालेले एकीकरण व अकोले (Akole) तालुक्यात रावण संघटनेने (Ravan Sanghatana) राम मंदिराबाबत केलेला अप्रचार त्यामुळे माझा पराभव झाला असल्याचे मी वक्तव्य केले होते. मात्र त्याचा विपर्यास करण्यात आला, असे त्यांनी म्हटले.
रावण संघटनेचा फटका बसला
सदाशिव लोखंडे पुढे म्हणाले की, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत येथे औपचारिक गप्पा सुरू असताना काही पत्रकारांनी विचारले की, राम मंदिर बांधले असतानाही तुमचा पराभव कसा काय झाला? त्यावर मी अकोले तालुक्यातील रावण संघटनेचा उल्लेख केला. रावण संघटना ही हिंदू विरोधी असून ती आदिवासी समाजात हिंदुत्व व रामाबाबत अप्रचार करत असून त्याचाच फटका आपल्याला अकोले तालुक्यात बसला. या वाक्याचा विपऱ्यास करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut : रवींद्र वायकर डरपोक, ईडी सीबीआयला घाबरून पळाले, संजय राऊतांची टीका