(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratnagiri News : पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार काश्मीरमधील कुपवाडामध्ये; शोध लागला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये!
Ratnagiri News : जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील बेपत्ता झालेली महिला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे सापडली आहे.
Ratnagiri News : जम्मू काश्मीरमधील (Jammu & Kashmir) कुपवाडा येथील बेपत्ता झालेली महिला रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली (Dapoli) येथे सापडली आहे. कुपवाडा पोलिसांनी दापोली येथे येऊन जरीना आणि तिच्यासोबत अब्दुल कादिर खान या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
कुपवाडामध्ये पत्नी हरवल्याची तक्रार, रत्नागिरीमध्ये शोध
काश्मीरमधील कुपवाडा (Kupwara) पोलीस स्टेशनमध्ये मुश्ताक अहमद या व्यक्तीने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवली होती. दरम्यान तपास करत असताना अब्दुल कादिर खान याचे महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये संपर्क असल्याची शंका पोलिसाना आली. त्याप्रमाणे सापळा रचला होता. पण अब्दुल कादिर खान याचा काही शोध लागत नव्हता.
दापोलीमध्ये दोघांना अटक
कुपवाडा पोलीस हे यापूर्वी देखील दापोली येथून येऊन गेले होते. दरम्यान, खूप वेळा पोलिसांना अब्दुल कादिर खान हा दापोली येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बेपत्ता महिलेचा पती मुश्ताक अहमद यांच्यासह पोलीस दापोलीमध्ये आले. दापोलीतील काही हॉटेल्समध्ये चौकशी करत असताना किंवा शोध घेत असताना अब्दुल कादिर खान आणि जरीना यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. यावेळी जरीना हिचा पती सोबत असल्याने ओळख पटवणे देखील सहज शक्य झाले.
दरम्यान दापोली पोलिसांनी देखील कुपवाडा पोलिसांना या संपूर्ण प्रकारात सहकार्य केले. कुपवाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज अहमद यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरु होता. दरम्यान बेपत्ता महिलेला ताब्यात घेतल्यानंतर याबाबतचा सखोल तपास सुरु आहे.
हेही वाचा