कोकणातील प्रस्तावित रिफायनरी भागात जमीन खरेदीचा धडाका; विदर्भातील आमदाराचाही समावेश, परप्रांतीयही आघाडीवर
Konkan Refinery Land Deal : बारसू आणि सोलगावसह आसपासच्या परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू आहेत. नेमक्या याच भागात जमिन खरेदीच्या व्यवहारांना वेग आला आहे. राज्यातील काही मोठ्या लोकांसह राजकारण्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
Konkan Refinery Land Deal : कोकणातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यानंतर आता राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगावसह आसपासच्या परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू आहेत. दरम्यान या भागात काही राजकारणी, काही अधिकारी यांच्यासह महाराष्ट्राबाहेरील राज्यातील लोकांनी जमीन खरेदी केल्याचा आरोप यापूर्वी होत होता. पण आता माहिती अधिकारातून याबाबतची सर्व माहिती हळूहळू समोर येत आहे.
राजापूर तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते समीर शिरवाडकर यांनी मागवलेल्या कागदपत्रांमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये विदर्भातील आमदार आशिष रणजीत देशमुख (MLA Ashish Deshmukh) यांच्या नावावर जवळपास 18 एकर जमिनीची खरेदी करण्यात आलेली आहे. वर्ष 2022 मध्ये हा जमीन खरेदीचा व्यवहार झाला आहे. यासह काही अधिकाऱ्याचे नातेवाईक आणि परराज्यातील लोकांनी देखील जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रकल्प येण्यापूर्वी जमीन खरेदी नेमकी कोणत्या उद्देशाने झाली? याबाबत उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
राजापूर तालुक्यातीलच (Rajapur Taluka) बारसु आणि सोलगावसह आसपासच्या गावामध्ये ही जमीन खरेदी केली गेली आहे. दरम्यान मागील दोन वर्षांमध्ये शेकडो एकर जमीन खरेदीचे व्यवहार याभागात झाल्याची बाब देखील माहिती अधिकारातून समोर आली आहे. याआधी रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये प्रस्तावित असताना, त्यावेळीदेखील प्रकल्पाच्या जवळच्या जमिनींचा मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. स्थानिकांनी केलेल्या विरोधानंतर रिफायनरी कोकणातून बारसू-सोलगाव आणि परिसरात सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, कोकणात रिफायनरी प्रकल्प नकोच, अशी मागणीदेखील स्थानिकांकडून होत आहे. बारसू-सोलगाव आणि जवळच्या गावातील ग्रामस्थांनी रिफायनरीला विरोध केला आहे.
कोण आहेत मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करणारे?
1 ) दुर्गा अनिल कुमार डोंगरे - 137 गुंठे
2 ) अखिलेश हरिश्चंद्र गुप्ता आणि नमिता अखिलेश गुप्ता - 92 एकर
3) आकांक्षा संजय बाकाळकर - 113 गुंठे
4 ) धार्मिल झवेरी - 3 हेक्टर
5 ) सोनल पिकेश शहा - 7.5 हेक्टर
6 ) विकेश वसंतलाल शहा - 156 गुंठे
7 ) निकेश शहा - 3 हेक्टर
8 ) रुपल विनीतकुमार शहा - 4 हेक्टर
9 ) अपर्णा तेजस शहा - 10 हेक्टर
10 ) देवेंद्र शर्मा - 4.5 हेक्टर
11 ) अनुराधा रेड्डी - 5 हेक्टर
12 ) सोनल शहा - 2 हेक्टर
13 ) श्रीकांत मिश्रा - 2 हेक्टर
14 ) देवेंद्र शर्मा - 6 हेक्टर
15 ) शशिकांत वालचंद शहा - 4.5 हेक्टर
16 ) नरेंद्र सिसोदिया - 4.5 हेक्टर
मुख्य बाब म्हणजे शहा कुटुंबीयांची जमीन खरेदीची कागदपत्र पडताळल्यानंतर त्यावर रायगड जिल्ह्यातल्या सुधागडमधील पाली या ठिकाणचा पत्ता आढळून येतो. यावर देखील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत संशय व्यक्त केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: