Ratnagiti ST: मुख्यमंत्र्यांच्या रत्नागिरी दौऱ्यात 170 एसटी गाड्यांचा वापर, चिपळूण आगारातील 56 फेऱ्या रद्द अन् प्रवाशी, विद्यार्थ्यांना मनस्ताप
CM Eknath Shinde Ratnagiti Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यासाठी जिल्ह्यातील 170 एसटी गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या.चिपळूण आगारातील 20 गाड्यांचा त्यात समावेश होता.

रत्नागिरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुक्रवारच्या रत्नागिरी दौऱ्यासाठी (CM Eknath Shinde Ratnagiti Visit) एसटी आरक्षित करण्यात आल्यामुळे चिपळून आगारातील तब्बल 56 फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन झालेल्या प्रकाराबद्दल प्रवाशांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. दौरा मुख्यमंत्र्यांचा, पण त्रास सर्वसामान्यांना असं काहीचं चित्र चिपळूनमध्ये पाहायला मिळालं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यासाठी चिपळूण आगारातील 20 एसटी बसेस रत्नागिरीत दिल्यामुळे त्याचा परिणाम तब्बल चिपळूण प्रवासी वाहतुकीवर झाला. त्याचा परिणाम म्हणून चिपळूण आगारातील 56 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
CM Eknath Shinde Ratnagiti Visit: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी जिल्ह्यातील 170 एसटी आरक्षित
श्रीमान हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे लोकार्पण आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन करण्यासाठी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री नएकनाथ शिंदे रत्नागिरीत आले होते. त्यासाठी रत्नागिरी आगरातील तब्बल 170 बस गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. यामधील चिपळूण आगरामधील 20 बस गाड्यांचाही समावेश होता. आगारातील 20 गाड्या गेल्याने तब्बल 56 बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. याशिवाय अपुऱ्या गाड्यांमुळे एसटीची वेळापत्रकही कोलमडल्याने सर्व गाड्या उशिराने धावत होत्या. या बसेस पुरवताना आगारातील शालेय फेऱ्या आणि इत्तर फेऱ्या रद्द होऊन विद्यार्थी तसेच स्थानिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचं सांगण्यात येत होतं. पण वास्तविक चित्र काही वेगळंच दिसून आलं.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे लोकांची पाठ, अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या
रत्नागिरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतील भाषणाकडे लोकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना त्या ठिकाणच्या अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याचं चित्र होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना उपस्थित लोकांनी पाठ फिरवल्याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहेत. त्यामुळे मुंबईतील दसरा मेळाव्याच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाकडे पाठ फिरवल्याची पुनरावृत्ती कोकणातही पाहायला मिळाली अशी चर्चा होती.























