Amravati : उमेश कोल्हेंच्या हत्येमुळे अमरावती शहरातील जनता भयभीत : खासदार अनिल बोंडे
उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमापूर्वीच भाजपच्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात युवा मोर्चा उपाध्यक्षाचाही समावेश आहे. त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहे.
अमरावतीः उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे अमरावती शहरातील जनता भयभीत आहे. अमरावती भयमुक्त व्हावी, अवैध धंद्यावर अंकुश राहावा, महिलांना भयमुक्त जगत यावं. तसेच सर्वांना श्रद्धांजली वाहता यावी यासाठी हे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खासदार अनिल बोंडे यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शहरात अवैध धंदे वाढले. या लोकांना संरक्षण मिळाले आणि त्यांचे गट तयार झाले म्हणून अमरावती भयग्रस्त झाली होती. 21 जूनला कोल्हे यांची हत्या झाली. मात्र आरोपींनी उद्देश सांगितला नाही. 10 दिवस हे प्रकरण पोलिसांकडून दडपण्यात आलं. तसेच कोल्हे कुटुंबावर दबाव आणण्यात आला. दुसरीकडे एनआयए आल्यावर सहा तासात दोन आरोपी अटक झाली. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. आम्ही शांतीपूर्ण पद्धतीने फक्त श्रद्धांजली सभेचे आयोजन केले असल्याचेही यावेळी बोंडे यांनी सांगितले.
राजकमल चौकाला छावणीचं स्वरुप
आम्ही शांतीपूर्ण पद्धतीने केवळ श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे बोंडे यांनी सांगितले असले तरी खबरदारी म्हणून पोलिसांनी सर्व उपाय योजना केल्या आहे. चौक परिसरात ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवण्यात येईल. तसेच संवेदनशील भागातून पोलिसांनी रुटमार्च काढल आहे. 500 पोलीस आधिकारी-कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या रुटमार्चमध्ये सहभागी होत्या.
श्रद्धांजली सभेपूर्वीच भाजपचे 5 जण पोलिसांच्या ताब्यात
सभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अमरावती पोलिसांच्यावतीने भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्षासह इतर चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यासोबतच अनेक नेत्यांना नोटीसही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे भाजप आक्रमक असून नेत्यांची पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे कळते.
नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्यांना धमक्या
उमेश कोल्हे यांच्या हत्येपूर्वी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ व्हॉट्सअँप स्टेटस टाकणाऱ्या लोकांना अनेकांना धमकावल्याचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. नुपूर शर्माच्या विधानाचे समर्थन करणारी पोस्ट अनेकांनी व्हॉट्सअँपवर स्टेटस म्हणून ठेवली होती. त्यानंतर त्यांना धमक्यांचे कॉल आले. धमकीच्या फोन कॉलनंतर धमकी देणाऱ्याने माफी मागणारा व्हिडिओही बनवला आणि व्हॉट्सअँपवर स्टेटस म्हणून पोस्ट केला. अशीच धमकी शहरातील एक प्रतिष्ठित डॉक्टरला आली होती. त्यानंतर पोलिसांनी आता अमरावती येथील रहिवासी डॉक्टर यांचा जबाब नोंदवला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत: रेहबर हेल्पलाइनचा सदस्य असल्याचे सांगितले होते. रहबर संस्था उमेश कोल्हेच्या हत्येचा सूत्रधार इरफान शेख याची आहे. धमकीच्या फोननंतर डॉक्टर यांनी माफी मागणारा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावरही पोस्ट केला होता.
मोबाईल दुकान चालवणाऱ्यालाही धमक्या
शहरातील एका मोबाईल दुकान चालवणाऱ्या व्यक्तीसोबतही असाच प्रकार घडला. त्यानेही नुपूर शर्माच्या समर्थनार्थ व्हॉट्सअँप स्टेटस ठेवले होते. त्यानंतर त्यालाही धमकीचा फोन आला. तसेच त्याला माफी मागण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी यापूर्वी कोणतीही कारवाई केली नाही, मात्र उमेश कोल्हेंचे प्रकरण एनआयएकडे गेल्यानंतर पोलिसांनीच या प्रकरणाची दखल घेत डॉ. यांचा जबाब नोंदवून अज्ञात लोकांविरुद्ध तक्रार नोंदवली.