नोकरी नसल्याच्या नैराश्यातून फेसबुक पोस्ट लिहून तरुणी निघाली होती आत्महत्या करायला, पण…
महिला सहाय्य कक्षाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच याची दखल घेऊन तिचा शोध घेत त्या मुलीचे मतपरिवर्तन केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पोलिसांचे त्यानिमित्ताने कौतुक होत आहे.
पुणे : नोकरी नसल्याच्या नैराश्यातून फेसबुकवर आत्महत्या करत असल्याची पोस्ट टाकत घरातून बेपत्ता झालेल्या एका तरुणीचे मतपरिवर्तन करत पोलिसांनी तिला धीर दिला. तसेच तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. महिला सहाय्य कक्षाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच याची दखल घेऊन तिचा शोध घेत त्या मुलीचे मतपरिवर्तन केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पोलिसांचे त्यानिमित्ताने कौतुक होत आहे.
30 वर्षीय तरुणी राहण्यास कोथरुड परिसरात आहे. तरुणी मूळची मुंबईतील आहे. पण काही वर्षांपूर्वी ते पुण्यात आले आहेत. ते भाड्याने राहतात. वडील व ती राहते. दरम्यान तिला नोकरी होती. पण लॉकडाऊनमध्ये ती गेली. यानंतर मात्र तिला नोकरी मिळत नव्हती. यामुळे ती नैराश्यात गेली होती. या नैराश्यातूनचं तिने फेसबुकवर आत्महत्या करणार असल्याबद्दल पोस्ट लिहिले. ती पोस्ट गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंह यांना मिळाली. त्यांनी तातडीने याची दखल घेत महिला सहाय्यक कक्षाच्या सहायक निरीक्षक सुजाता शानमे यांना सांगितले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. तसेच हा सर्व प्रकार त्यांनी दामिनी पथकाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर दामिनी पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली.
फेसबुकवरील माहितीच्या आधारे या तरूणीचा मोबाईल नंबर व राहत्या घराचा पत्ता पोलिसांनी मिळवला. पण तो बंद लागत होता. मग दामिनी पथकाच्या मार्शलने या तरुणीच्या घराच्या पत्त्यावर धाव घेऊन तिच्या आई-वडिलांना याबाबत कल्पना दिली . त्यांनी ती सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडल्याचे सांगितले. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयाकडून सदर तरुणीच्या मित्र-मैत्रिणीचे मोबाईल नंबर घेत त्यांना फोन केला. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी एका मित्राने ती याच परिसरात असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस व मित्रांनी कोथरुड भागात तिचा शोध घेतला. त्यावेळी ती एका मॉलच्या बाहेर बसल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तिला धीर देत कोथरुड पोलीस ठाण्यात नेले. तसेच तिचे मत परिवर्तन केले. तिला धीर देऊन वडिलांसोबत घरी पाठवले. आता पोलीस तिला नोकरी देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.