महिला दिन विशेष : शिक्षण अवघं चौथी, वय 52 वर्षे आणि वार्षिक उलाढाल तीन कोटींची, पुण्यातील मंगल दळवींची प्रेरणादायी यशोगाथा
अवघं चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या पुण्यातील एक महिला वर्षाला तीन कोटींची उलाढाल करतेय. महिला दिनानिमित्त त्यांच्या संघर्षाचा घेतलेला आढावा.
पुणे : अवघं चौथी पर्यंतच शिक्षण घेतलेली 52 वर्षाची महिला आज किती रुपयांची वार्षिक उलाढाल करत असेल? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर कोटींच्या घरात नक्कीच नसेल. पण पुण्यातील एक महिला याला अपवाद आहे. त्यामुळे आता तुम्हाला पुढचे प्रश्न नक्कीच पडले असतील की, ही महिला नेमकी कोण? काय व्यवसाय करते? किती कोटींची उलाढाल करते? महिला दिनाच्या निमित्ताने या महिलेच्या यशोगाथेतून तुम्हाला या सर्वांची उत्तरं मिळणार आहेत.
अवघं चौथीचं शिक्षण घेतलेल्या पुण्याच्या मावळमधील मंगल दळवी फाडफाड इंग्रजी बोलून रोपांची नावे घेतात. केवळ इंग्रजीत रोपांची नावं घेण्याईतकच त्यांचं कर्तृत्व आहे असं नव्हे तर आज बावन्नव्या वर्षात त्या वार्षिक तीन कोटींची उलाढाल करतायेत. होय, तुम्हाला विश्वास बसत नसला तरी त्यांच्या योगदानामुळे दळवी कुटुंबियांच्या संसाराची घडी बसलेली आहे. हलाखीच्या परिस्थितीने त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं. पण रोपवाटीकेच्या छंदाने मात्र त्यांना अच्छे दिन दाखवले.
हलाखीच्या परिस्थितीमुळे मी केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेऊ शकले. तेव्हाच माझा भाऊ रोपवटीकेचे प्रशिक्षण घेत होता. नंतर त्याने रोपवाटीकेचे व्यवसाय सुरू केला. मलाही त्याची आवड निर्माण झाली. मीही भावाला मदत करता करता शिकून घेतलं. लग्नानंतर इथल्या शेतीचा अंदाज घेतला. पण पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं, भविष्याचा विचार केला तर प्रगती होणार नव्हती. मग मी पतींना रोपवाटीकेच्या व्यवसायबाबत कल्पना दिली. त्यांचा होकार मिळताच पाच गुंठ्यांत गुलाब फुलांची रोपं फुलवली. बघताबघता व्यवसाय बहरला आणि आज तीन कोटींची उलाढाल होऊ लागली. इतका मोठं भांडवल होईल आणि देशभरातून रोपांना मागणी येईल अशी अपेक्षा कधी केली नव्हती, अशी प्रतिक्रिया मंगल दळवी यांनी दिली.
लग्नापूर्वी मारुती दळवी हे शेतीतून कशीबशी वार्षिक तीस हजारांची उलाढाल करायचे. पण 1990 मध्ये अवघं चौथीचं शिक्षण घेतलेल्या मंगल दळवी, त्यांच्या आयुष्यात आल्या आणि पवनानगरमध्ये त्यांनी अवघ्या पाच गुंठ्यांत रोपवाटीकेच्या व्यवसायाला सुरुवात केली. बघताबघता हा व्यवसाय दहा एकरमध्ये विस्तारलाय आणि आत्ता वर्षाला तीन कोटींची आर्थिक उलाढाल होतेय. एकीकडे पतींना उभारी मिळाली तर दुसरीकडे मुलाने आईच्या घामातून प्रेरणा घेतली आणि स्वतः बीएससी ऍग्रीची पदवी घेत, तो रोपवाटीकेला हातभार लावतोय.
हे विश्व आईने निर्माण केलं, हे मी माझ्या डोळ्याने पाहिलंय. लहानपणापासूनच रोपवाटिकेत खेळलो-बागडलो, यातच भविष्य पहा असे बाळकडूही मिळाले. अशिक्षित आईने जे करून दाखवले, त्यातून मी ही प्रेरणा घेतली. कृषी क्षेत्रातील बीएससी ऍग्रीची पदवी घेत मीही हाच व्यवसाय सुरू ठेवण्याचा निश्चय केला असल्याचे मुलाने सांगितले.
शासनाकडून कामाची दखल मंगल दळवींच्या रोपवाटिकेत आज चाळीस जणांना रोजगार मिळालाय, शिवाय परिसरातील गरजूंना त्या प्रशिक्षणही देतात. म्हणूनच याची दखल प्रशासनानेही घेतलीये. राज्य सरकारकडे पुरस्कारासाठी मंगल दळवींच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती मावळ पंचायत समितीचे कृषी अधिकारी संताजी जाधव यांनी दिली.
जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ मोठमोठ्या पदव्या हाती असायलाच हव्यात, या धारणेला मंगल दळवींनी तिलांजली दिलीय. म्हणूनच एबीपी माझा त्यांच्या या यशोगाथेला सलाम करते.