Yugendra Pawar : पवार कुटुंबातील आणखी एक पुतण्या राजकारणात, अजित पवारांच्या पुतण्याचा शरद पवारांसोबत फोटो; कोण आहेत युगेंद्र पवार?
Who Is Yugendra Pawar : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांच्या लहान बंधूंचे पुत्र असलेले युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते. आता ते राजकारणात येण्याचे संकेत आहेत.
पुणे: बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. पण या कुस्त्यांपेक्षा सर्वाधिक चर्चा आहे ती त्याचे आयोजन करणाऱ्या युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांची. युगेंद्र पवारांच्या रुपात बारामतीतील पवार कुटुंबीयांचा आणखी एक वारसदार राजकारणात येण्याच्या तयारीत आहे. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे (Ajit Pawar Nephew) असून त्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसोबत फोटो झळकल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.
बारामती कुस्तीगीर संघाच्या वतीने आज बारामती मध्ये भव्य कुस्तीचा आयोजन करण्यात आले आहे. युगेंद्र पवार हे बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. ते अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. पण त्यांचे फोटो शरद पवारांसोबत झळकल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
आगामी काळात युगेंद्र पवार आम्हाला राजकारणात दिसणार का हा प्रश्न विचारला असता युगेंद्र पवारांनी जर लोकांची इच्छा असेल तर नक्कीच येईन असं उत्तर दिलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर युगेंद्र पवार यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांना भेटायला गेल्यानंतर युगेंद्र पवार चर्चेत आले होते.
कोण आहेत युगेंद्र पवार? (Who Is Yugendra Pawar)
युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू आहेत. शरद पवारांना फॉलो करणारे युगेंद्र पवार हे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. बारामतीतील शरयू अॅग्रोचे ते अध्यक्ष आहेत तसेच विद्या प्रतिष्ठानमध्येही विश्वस्त आहेत. फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना हा युगेंद्र पवार पाहतात.
एकीकडे राष्ट्रवादीची फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या पुतण्याने त्यांना सोडून वेगळी चूल मांडल्याचं दिसून येतंय. त्याचवेळी त्यांच्या पुतण्याने आपल्या आजोबांना साथ द्यायचं ठरवलं आहे. पवार कुटुंबातील तिसरी पीढी राजकारणात आहे. रोहित पवार हे आमदार असून त्यांनी शरद पवारांच्या सोबत राहण्याचं ठरवलं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. आता पवार कुटुंबीयातील आणखी एक वारसदार, युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय होत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे येत्या काळात बारामतीच्या निवडणुकीच्या राजकारणात चांगलीच रंगत पहायला मिळण्याची शक्यता आहे.
बारामतीत कुस्त्यांचे आयोजन
बारामतीतील शारदा प्रांगण येथे या कुस्त्या पार पडणार आहेत. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी शरद पवार यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त कुस्त्यांचे आयोजन केले आहे.
अजित पवार बारामतीत मेळावा घेणार
उपमुख्यमंत्री अजित रविवारी बारामती दौऱ्यावर असणारा आहेत. त्या निमित्ताने अजित पवार नूतन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार समारंभ करणार आहेत. तसेच कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. रविवारी दुपारी दीड वाजता कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. बारामती शहरातील जिजाऊ भवन येथे हा मेळावा पार पडणार आहेत. अजित पवार या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा: