Harshvardhan Patil: '...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Harshvardhan Patil: शरद पवारांची भेट घेऊन याबाबतचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. त्याचबरोबर त्यांना पक्षप्रवेशाबाबतची तारीख विचारताच त्यांनी मोठं भाष्य केलं आहे.
इंदापूर: गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) तुतारी फुकंणार या चर्चा सुरू होत्या, त्या चर्चांना आज पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी पुर्णविराम दिला आहे. आज भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज जोरदार भाषण केलं. त्या भाषणातून त्यांनी तुतारी फुंकणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच कार्यकर्त्यांना विचारुन भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली. याबाबत त्यांनी आधी देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर शरद पवारांची भेट घेऊन याबाबतचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. त्याचबरोबर त्यांना पक्षप्रवेशाबाबतची तारीख विचारताच त्यांनी मोठं भाष्य केलं आहे.
पक्षप्रवेश कधी होणार?
पक्षप्रवेश कधी होणार या पत्रकाराच्या प्रश्नावर बोलताना हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) म्हणाले, आम्ही सर्वांनी त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष, शरद पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे हे या सदर्भातील निर्णय घेतील, या संदर्भातील निर्णय सांगण्याचा मला अधिकार नाही, असं हर्षवर्धन पाटील यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणालेत.
देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीत काय घडलं?
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) म्हणाले, मी शरद पवारांना भेटण्याच्या चार दिवस आधी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, त्यांनी रात्रीची वेळ दिली. दिड ते दोन तास आमची चर्चा झाली. त्यांनी काही प्रस्ताव माझ्यासमोर ठेवले, त्यांनी काही भूमिका माझ्यासमोर मांडली. मी पण माझी भूमिका त्यांच्यासमोर मांडली. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर, मी मांडलेल्या भूमिकेवर गेल्या दोन महिन्यात तुम्ही केलेल्या आग्रहाच्या बाबतीतील भूमिका या सर्वांवर माझी आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली. मी त्यावेळी फडणवीसांना सांगितलं, मला माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या विरोधात जाता येणार नाही. ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी गेल्या दहा वर्षांत माझ्यासाठी मोठा संघर्ष केला, मोठा अन्याय सहन केला. त्या माझ्या कार्यकर्त्यांने माझी साथ कधी सोडली नाही. आज तुम्ही सांगाल त्यानंतर मी जो निर्णय घेईल तो व्यक्तीगत होईल , त्या व्यक्तीगत निर्णयापेक्षा मला माझ्या इंदापुरातील माझ्या आम जनतेच्या भावनेसाठी, त्या भावनेच्या मागं उभं राहावं लागेल, हे मी फडणवीसांना सांगितलं, त्यावर फडणवीस म्हणाले, ठिक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं तो निर्णय घ्या, माझ्याही भावना समजून घ्या, असं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं आहे.
शरद पवारांना भेटलो- काय काय चर्चा झाली?
हर्षवर्धन पाटील म्हणाले, विधानसभेबाबत काय निर्णय घ्यायचा यासाठी सर्वांना बोलवलंय. काल सिल्व्हर ओकवर शरद पवारांशी बैठक झाली. पवारांनी काल विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या. त्यानंतर बाकीची जबाबदारी माझी राहील. मग आपण प्रवेश करायचा की नाही? हे माझ्या इंदापूरच्या जनतेने ठरवावे. इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय निर्णय जनतेच्या मताने झाले आहेत. इंदापुरात कोणाच्या स्वार्थासठी निर्णय होत नाहीत.