Vasant More : हातात भगवे झेंडे, गाड्यांचा मोठा ताफा, वसंत मोरे मुंबईच्या दिशेने रवाना, आज ठाकरेंची मशाल हाती घेणार
Vasant More will join Shiv Sena UBT : मातोश्री येथे आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. पुण्यातून ते मुंबईकडे रवाना झाले असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.
![Vasant More : हातात भगवे झेंडे, गाड्यांचा मोठा ताफा, वसंत मोरे मुंबईच्या दिशेने रवाना, आज ठाकरेंची मशाल हाती घेणार Vasant More will join Shiv Sena UBT today after leaving Vanchit Bahujan Aghadi Pune Maharashtra Politics Marathi News Vasant More : हातात भगवे झेंडे, गाड्यांचा मोठा ताफा, वसंत मोरे मुंबईच्या दिशेने रवाना, आज ठाकरेंची मशाल हाती घेणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/0e93674d323d4cb6734224165d152d7c1720501321469923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : गाड्यांचा मोठा ताफा, हातात भगवे झेंडे घेत पुण्याचे वसंत मोरे (Vasant More) मुंबईच्या (Mumbai) दिशेने रवाना झाले आहेत. ते आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत (Shiv Sena UBT) प्रवेश करणार आहेत. मातोश्री येथे आज उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. वसंत मोरे हे पुण्यातून जंगी शक्तीप्रदर्शन करत मुंबईकडे मार्गस्थ झाले आहेत.
पुणे लोकसभेची निवडणूक वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) तिकीटावर लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यानंतर वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज वसंत मोरे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मागील आठवड्यात त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचवेळी आपण पक्षात पक्ष प्रवेश करू इच्छितो, असे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात प्रवेश?
आज दुपारी मातोश्री या ठिकाणी वसंत मोरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होणार आहे. वसंत मोरे या आधी मनसे आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटात वसंत मोरे प्रवेश करत असल्याची माहिती मिळत आहे.
प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एका पत्रकार परिषदेत वसंत मोरेंवर जोरदार टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, वसंत मोरेंचे राजकारण आयाराम-गयारामांसारखे आहे. मोरेंना माणसे ओळखता येत नाहीत. त्यांच्याकडून सातत्याने अशा गोष्टी घडत आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली होती.
वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांना मेसेज
वंचित बहुजन आघाडी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना मेसेज टाकल्याची माहिती दिली होती. 'साहेब मला माफ करा', असे त्या मेसेजमध्ये लिहिले होते. मला माझ्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करणे गरजेचे आहे. त्यानुसार मी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मला प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला होता, असे त्यांनी सांगितले होते. तसेच उद्धव ठाकरेंचा जो संघर्ष आहे, तो माझ्यासारख्या संघर्षातून आलेल्या कार्यकर्त्याला आकर्षित करतो. आपण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या सर्वांचा संघर्ष आपण जवळून पाहतोय. उद्धव ठाकरे जी जबाबदारी माझ्यावर सोपवतील, ती मी पार पाडेन, असेही वसंत मोरेंनी सांगितले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)