Vasant More: कोकणात जाऊन मासे न खाताच माघारी परतले! कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेच्या अभिजीत पानसेंची माघार; वसंत मोरेंनी राज ठाकरेंना डिवचलं
Maharashtra Politics: कोकण पदवीधरमधून राज ठाकरेंच्या मनसेची माघार 'सशर्त'; वारंवार असं घडणार नाही, फडणवीसांचा राज ठाकरेंना शब्द. राज ठाकरे यांची आणखी एका निवडणुकीतून माघार. वसंत मोरे यांचा मनसेला टोला
पुणे: कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजीत पानसे यांनी माघार घेतली आहे. भाजपच्या निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड यांनी शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर मनसेकडून (MNS) काहीवेळातच अभिजीत पानसे (Abhijit Panse) हे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे मनसे नेते आणि पुणे लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला टोला लगावला. (Konkan graduate constituency)
वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये वसंत मोरे यांनी म्हटले आहे की, कोकणात जाऊन काही लोक मासे न खाताच मुंबईत परतली. या माध्यमातून वसंत मोरे यांनी अप्रत्यक्षपणे मनसेला टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निर्णयावरुन मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. यानंतर राज ठाकरे यांनी आणखी एका निवडणुकीतून माघार घेतल्याने त्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता वसंत मोरे यांनी केलेल्या टीकेला मनसेचे नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.
राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघातून का माघार घेतली?
कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने माघार घेतल्यानंतर नितीन सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी हे 3 जूनला रात्री शिवतीर्थवर येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्यासंदर्भात राज साहेबांना वैयक्तिक विनंती केली होती. त्यानंतर आज सकाळी निरंजन डावखरे 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. यानंतर राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन अभिजित पानसे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत, असा निर्णय घेतला असल्याचे नितीन सरदेसाई यांनी सांगितले.
कोकणात जाऊन काही लोक मासे न खाताच मुंबईत परतली... pic.twitter.com/B1z2LXdNST
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) June 7, 2024
मात्र, आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आम्हाल निवडणूक लढवणे भाग आहे, हा मुद्दा राज ठाकरे यांनी फडणवीस यांच्यासमोर मांडला होता. त्यावेळी फडणवीसांनी अशा पद्धतीच्या गोष्टी वारंवार होणार नाहीत, असे आश्वासन राज ठाकरे यांना दिल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. राज ठाकरे मनसेच्या फायद्याचा विचार करुनच निर्णय घेतात. राजकारणात बऱ्याच गोष्टींचा परिणाम लगेच दिसून येत नाही, काही गोष्टींचा फायदा कालांतराने दिसत असतो. काय फायदा होईल, हे तुम्हाला नजीकच्या काळात कळेलच, असे नितीन सरदेसाई यांनी सांगितले होते.
आणखी वाचा