उमेदवार जाहीर करूनही कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंची माघार, भाजपचे निरंजन डावखरेच निवडणूक लढवणार
कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंच्या मनसेची माघारभाजपचे वसंत डावखरेच निवडणूक लढवणार
मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना बिनशर्त पाठींबा देत महायुतीच्या सभांमध्ये (Mahayuti) सहभागी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाकडून अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांची उमेदवारी जाहीर करुन भाजपला धक्का दिला होता. त्यानंतर मनसे वि. भाजप असा सामना रंगणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर राज ठाकरेंची मनधरणी करण्यात भाजपला यश आले असून कोकण पदवीधर निवडणुकीतून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) माघार घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर कोकण पदवीधरची निवडणुकीची चुरस रंगात आली होती. भाजप वि. मनसे सामना रंगणार या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर भाजपने हालचाली करत राज ठाकरेंची मनधरणी करण्यासाठी निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड यांना राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर पाठवले. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. सकाळीच शिवतिर्थावर पोहचलेल्या प्रसाग लाड आणि निरंजन डावखरे यांना राज ठाकरेंची मनधरणी करण्यात यश मिळाले. त्यानंतर राज ठाकरेंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला.
भाजपकजून निरंजन डावखरे रिंगणात आहेत. डावखरे हे मागच्या दोन टर्मपासून कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार आहेत. डावखरे यांच्यासाठी मनसेने माघार घेतली आहे. या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती
राज ठाकरेंची खेळी भाजपसाठी धक्का
महायुतीत विधानसभेचं बिगुल वाजण्याआधीच जागांवरून रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच त्यापूर्वी राज्याच्या राजकारणात विधान परिषदेची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी, भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर केली. राज ठाकरेंची ही खेळी भाजपसाठी धक्का असल्याचं बोललं जात आहे. कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ समजला जातो आणि याच मतदारसंघात निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी अचानक अभिजीत पानसेंचं नाव जाहीर करून भाजपची पुरती गोची केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. राज्यात बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अतिरीक्त मदतीमुळे, यंदाही निरंजन डावखरेंसाठी ही लढत सोपी मानली जात होती. पण ऐनवेळी राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यामुळे, महायुतीच्या गोटात मिठाचा खडा टाकल्याची चर्चा रंगली होती.