Vasant More on Brij Bhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला मनसेचा विरोध नाही; वसंत मोरेंचं स्पष्टीकरण
बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला मनसे कोणताही विरोध करणार नाही, असं स्पष्टीकरण पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी दिलं आहे. राज ठाकरेंनी स्वत: विरोध न करण्याचे आदेश दिल्यानंतर वसंत मोरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
![Vasant More on Brij Bhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला मनसेचा विरोध नाही; वसंत मोरेंचं स्पष्टीकरण Vasant More on Brij Bhushan Sharan Singh about pune maharsahtra kesari compititaion Vasant More on Brij Bhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला मनसेचा विरोध नाही; वसंत मोरेंचं स्पष्टीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/9da4280c846fce69bcb5aae3ba0a32fc1670568202837442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vasant More on Brij Bhushan Singh : भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत (Sharad Pawar) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. बृजभूषण सिंह यांनी हे आमंत्रण स्वीकारलं आहे. त्यांच्या पुणे दौऱ्यावर मनसे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं होतं. मात्र मनसेने (MNS) भूमिका स्पष्ट केली आहे. बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला मनसे कोणताही विरोध करणार नाही, असं स्पष्टीकरण पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी दिलं आहे.
बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला विरोध करु नका, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्यावर वसंत मोरे यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. ठाकरे यांचा जून महिन्यातील अयोध्या दौऱ्याला त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे आयोध्येला जाऊ शकले नव्हते. त्यावेळी बृजभूषण सिंह आणि राज ठाकरे यांच्यात वाद निर्माण झाले होते. मनसेने त्यांच्या भूमिकेचा विरोध केला होता. त्यामुळे मनसेच्या भूमिकेवर लक्ष होतं.
'... पाय ठेवू दिला नसता!'
वसंत मोरे म्हणाले, बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याबाबत स्वत: राज ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे. त्यांनी दौऱ्याला विरोध न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आम्ही बृजभूषण सिंह यांना पुण्यात प्रवेश देणार आहोत. राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन करणं पक्षाच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं काम आहे. ते काम आम्ही करत आहोत. राज ठाकरेंनी जर आदेश दिले नसले तर बृजभूषण सिंह यांना महाराष्ट्रात पाय ठेवू दिला नसता, असंही वसंत मोरे म्हणाले.
'भाजपचा कोणताही दबाव नाही'
बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार असल्याने मनसेचा भाजपवर दबाव असल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. त्यांनी घेतलेल्या अनेक भूमिकांवरुन देखील ते अनेकदा स्पष्ट झालं आहे. याबाबतीत देखील दबाव आहे का? असं विचारल्यास वसंत मोरेंनी खडसावलं. ते म्हणाले, आम्ही कोणत्याही पक्षाच्या दबावाखाली येणारे नाहीत. वेळोवेळी झालेल्या आंदोलनातून आम्ही हे दाखवून दिलं आहे. अनेक मंत्र्यांचे कॉलेज, टोलनाके फोडून आम्ही खळ्ळखट्याक आंदोलन केलं आहे. त्यामुळे दबाव म्हणून नाही तर राज ठाकरेंचा आदेश म्हणून आम्ही बृजभूषण सिंह यांना पुण्यात प्रवेश देणार आहोत, असं त्यांनी म्हटलं.
जानेवारीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. अनेक वादानंतर यावर्षीच्या महाराष्ट्र केसर कुस्ती स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या 11 ते 15 जानेवारीदरम्यान पुण्यात ही स्पर्धा रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)