Amit Shah at Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज पुणे दौरा; भाजपकडून जय्यत तयारी, विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी
Maharashtra Pune Bypoll Election : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर असून आज पुण्यात विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत.
Maharashtra Pune Bypoll Election : एकीकडे पुण्यातील कसबा (Kasba ByPoll Election) आणि चिंचवड पोटनिवडणुकीची (Chinchwad by-election) राज्यभर चर्चा आहे आणि त्यातच या पोटनिवडणुकीसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज (18 फेब्रुवारी) थेट मैदानात उतरणार आहेत. गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस पुणे (Pune News) दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध कार्यक्रमांना देखील उपस्थित राहणार आहे.
आज अमित शाहांच्या हस्ते 'मोदी ॲट ट्वेन्टी' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यासोबतच रात्री ते ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन घेणार आहे आणि खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत. तर उद्या अमित शाह हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मोदी ॲट ट्वेन्टी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठा सार्वजनिक कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात येणार आहे.
भाजपकडून जय्यत तयारी
अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मोठे मोठे बॅनर्सदेखील लावण्यात आले आहे. ओंकारेश्वर मंदिराचं ते दर्शन घेणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कसा असेल अमित शहांचा पुणे दौरा?
18 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:35 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं पुणे विमानतळावर आगमन होईल. तिथून 2 : 50 वाजता सिंहगड कॉलेजच्या हेलिपॅडजवळ अमित शहांचा ताफा पोहोचेल. त्यानंतर 3 वाजता सहकार परिषद, दैनिक सकाळ, हॉटेल टिपटॉप, वाकड येथे ते हजेरी लावणार आहेत. पाच वाजता काश्मीरमध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलींसोबत जे डब्ल्यू मॅरिएटमध्ये संवाद साधणार आहे. आठ वाजता मोदी @20 पुस्तक प्रकाशन शहांच्या हस्ते होणार आहे. 9 वाजता ते ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन घेणार आहे. त्यानंतर रात्री उशिरा खासदार गिरीश बापट यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. त्यानंतर 19 तारखेला बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या एका टप्प्याचं लोकार्पण करणार आहेत.
दरम्यान, पुणे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीयांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी फोनवरुन संवादही साधला होता. तसेच, त्यांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं होतं. मात्र महाविकास आघाडी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. तसेच, पुणे पोटनिवडणुकीत विजय महाविकास आघाडीचाच होणार असा विश्वासही महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे पुणे पोटनिवडणूक चुरशीची होणार यात शंकाच नाही. अशातच अमित शहांचा पुणे दौरा पुणे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.