पोलिसांची वर्दी घालून सोन्याचे दुकान लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न
सराफ व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला असला तरी आरोपीने जाता जाता हवेत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही

पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथील बालाजी ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानात पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी लुटमार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सराफ व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला असला तरी आरोपीने जाता जाता हवेत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
पुणे-सातारा महामार्गावर कापूरहोळ येथे बालाजी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. आज दुपारच्या सुमारास पोलिसांच्या वेशात आलेला एका व्यक्तीने तुम्ही चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करता असा आरोप करत धमकावले. दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने एका पिशवीत भरण्यास सांगितले. दरम्यान पोलीस असे दागिने भरून घेऊन जात नसल्याचे सराफाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीला उलट विचारणा केली. दरम्यान आरोपीच्याही लक्षात आल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. सराफ व्यावसायिकाने त्याला पकडलेही होते पण आरोपीने हवेत गोळीबार केला आणि पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ज्वेलर्स मधील cctv ताब्यात घेतले असून आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
