Ajit Gavahane: अजित गव्हाणेंची एंट्री दुसरीकडे ठाकरे गटात नाराजी; तुतारीचा प्रचार करायचा की नाही? यावर ठाकरे गटाची चर्चा, उद्या मातोश्रीवर जाणार
Ajit Gavahane: अजित गव्हाणेंनी आज तुतारी फुंकली त्यानंतर ठाकरेंच्या सेनेत अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. भोसरीत तुतारीचा प्रचार करायचा की नाही? याबाबत आज बैठकीत चर्चा झाली आहे.
Ajit Gavahane: पिंपरी-चिंचवडमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavahane) आणि समर्थकांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर आता त्याचे पडसाद ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये उमटल्याचं चित्र दिसून येत आहे. अजित गव्हाणे आणि समर्थकांच्या पक्षप्रवेशानंतर भोसरी विधानसभेतील शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठक घेतली. त्यानमध्ये अजित गव्हाणेंना तिकीट दिलं, तर आपण तुतारीचा प्रचार करायचा का नाही? याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
गव्हाणेंच्या (Ajit Gavahane) प्रवेशाने शिवसैनिकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असून उद्या(गुरूवारी) हे सर्व नेते पदाधिकारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत. याच नाराजीतून उद्या भोसरी विधानसभेत होणाऱ्या जनता दरबारास खासदार अमोल कोल्हेंनी येऊ नये. अशी आक्रमक भूमिका देखील शिवसैनिकांनी घेतली आहे. महिन्याभरापूर्वी कोल्हेंना निवडून आणण्यासाठी ज्यांनी घाम गाळला आज तेच शिवसैनिक कोल्हेंचा जनता दरबार रद्द करण्याची भाषा करत असल्याचं चित्र दिसून येत आहे.
या बैठकीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली?
आज काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)मध्ये पक्षप्रवेश केला. ज्यांनी भोसरीमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात काम केलं त्यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे आज आमच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे निष्ठा आणि गद्दारी यांच्याभोवती फिरते आहे. सामान्यांना न पटणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही अस्वस्थ आहोत. उद्या आम्ही मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहोत. लोकसभा निवडणुकीत आम्ही अमोल कोल्हे यांचं काम केलं होतं. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी अशी आमची आग्रही मागणी आहे, निष्ठावंताला ही जागा मिळाली अशी आमची मागणी आहे असं यावेळी पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांचा शरद पवाराच्या पक्षात प्रवेश
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. ४ पदाधिकाऱ्यांसह एकूण २४ जणांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत या २४ जणांनी तुतारी हाती घेतली आहे. काल(मंगळवारी) या सर्व नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपवले होते. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवारांना (Ajit Pawar) मोठा धक्का मानला जात आहे. तर काल राजीनामे दिलेले पदाधिकारी आज शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे.
VIDEO : ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये अशोक गव्हाणेच्या पक्षप्रवेशानंतर काय झाली चर्चा?
संबधित बातम्या: Sharad Pawar: अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग; पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांचा शरद पवाराच्या पक्षात प्रवेश, वाचा नावांची यादी