Pune crime News: पुण्यात 60 वर्षीय आजोबांचा कळस; "पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा" गाणं म्हणत काढली महिलेची छेड; आजोबांवर गुन्हा दाखल
पुण्यात महिलेकडे बघत "पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा" हे गाणे म्हणणं एका 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या चांगलंच अंगलट आलं आहे. या वृद्ध व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत अनेक वेळा या महिलेची छेड काढली.
Pune crime News: तरुणांनी महिलेची किंवा तरुणीची छेड काढल्याचे प्रकरणं रोज समोर येतात. विविध प्रकारे त्रास देत कधी गाणं म्हणत किंवा वेगवेगळ्या नावाने हाक मारत छेड काढतात. मात्र पुण्यात एका आजोबांनी छेड काढण्याच्या बाबतीत कळस गाठला आहे. महिलेकडे बघत जोरात लावणी गात छेड काढली आहे. त्यामुळे महिलेनं संताप व्यक्त केला आहे.
पुण्यात महिलेकडे बघत "पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा" हे गाणे म्हणणं एका 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या चांगलंच अंगलट आलं आहे. या वृद्ध व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत अनेक वेळा या महिलेची छेड काढली. त्यावरुन महिलेने थेट पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या वृद्ध व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी हा येरवाड्यात असलेल्या जामा मशीदी जवळ पीडित महिलेच्या घरी भाड्याने राहत होता. मद्यधुंद अवस्थेत अनेक वेळा घरी यायचा. राडा करायचा. त्याच दरम्यान "पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा" हे गाणं म्हणायचा. अनेक वेळा वेगवेगळ्या करामती करुन त्या वृद्ध व्यक्तीने महिलेची छेड काढत होता. महिलेचा संताप अनावर झाला आणि महिलेने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांकडून या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आधीदेखील 2018 मध्ये अशाच प्रकारचं प्रकरण घडलं होतं. त्यावेळी एका 62 वर्षीय आजोबांनी थेट विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात हवाई सुंदरीची छेड काढली होती. त्यानंतर तिला वाईट स्पर्श देखील केला होता. हे सगळं प्रकरणं दिल्लीत घडलं होतं. मात्र आजोबा पुणेकर होते. ते पुण्यात नामवंत व्यावसायिक होते. कायम विमान प्रवास करायचे मात्र या प्रकरणानंतर आजोबांवर कारवाई करण्यात आली होती. दिल्लीत आजोबांना अटक करण्यात आली होती. विस्तारा एअरलाईन्सच्या वतीने मोठी बैठक घेण्यात आली होती. चुकीच्या वर्तवणूक करणाऱ्यांना तीस दिवस विमानप्रवासासाठी बंदी घातली होती.