कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या; मनोरंजनसृष्टीतली युनियन्सची दहशत पुन्हा उघड
आत्महत्येपूर्वी कलादिग्दर्शक राजू सापते यांनी एक व्हिडिओ तयार केलाय. हा व्हिडिओ आल्यानंतर मनोरंजनसृष्टीतल्या अनेकांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कुणाचेच फोन घेतले नाहीत.
अगोबाई सूनबाई, काय घडलं त्या रात्री, मन्या द वंडर बॉय, साटंलोटं, राजधानी एक्स्प्रेस आदी चित्रकृतींचे कलादिग्दर्शक राजू सापते यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ करून त्यांनी हे टोकाचे पाऊल आपण का उचलत आहोत याचं कारण दिलं. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत असल्याचं कारण देत आपल्या समोर आता काहीच पर्याय उरला नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या व्हिडिओमुळे मराठी मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे.
राजू सापते हे अत्यंत मनमिळावू कलादिग्दर्शक होते. गेल्या 22 वर्षांपासून राजू या विश्वात आपलं काम करत आहेत. अत्यंत शांत मनमिळावू स्वभावामुळे राजू यांच्याकडे काम पुन्हा पुन्हा येत असत. सध्या लॉकडाऊन नंतरच्या काळात राजू यांच्याकडे तब्बल पाच मालिकांचे काम होतं. परंतु युनियनच्या दहशतीमुळे त्यातलं एक काम आपण सोडून दिल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, गेल्य काही दिवसांपासून मला राकेश मौर्य वारंवार पैशावरून त्रास देत आहेत. मी काही कामगारांचे पैसे देणे लागतो असं सांगून मला त्रास दिला जातोय. वास्तविक मी सर्वांचे पैसे वेळेवर दिेले आहेत. पण असं असूनही हा त्रास दिला जातो. कामगार दिले जात नाही. म्हणून मी एक झीचा प्रोजेक्ट सोडला. दशमी क्रिएशन्सचं कामही मी करतो आहे. पण हा त्रास दिल्यामुळे आता आत्महत्या करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर उरलेला नाही.
राजू यांच्या आत्महत्येनंतर मनोरंजनविश्वात खळबळ उडाली आहे. कला दिग्दर्शकांचीही एक असोसिएशन आहे. त्याचे सचिन रंगराव चौगुले याबाबत माझाशी बोलताना म्हणाले, युनियन्सची ही मक्तेदारी नेहमीची आहे. याबाबत आजवर कोणी बोललं नाही. पण त्यांच्या या धाकामुळेच राजू यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही फेसबुक पोस्ट करून अशी दडपशाही करणाऱ्यांची आपण गय करणार नाही असं सांगितलं आहे. राजू सापते यांनी शुक्रवारी हा व्हिडिओ केल्यानंतर ते आत्महत्या करत असल्याची माहीती संबंधितांनी मजदूर युनियनला दिली होती. परंतु, त्यांनी त्याकडे काणाडोळा केल्याचा आरोपही आता होऊ लागला आहे. मजदूर युनियननी वेळीच पाऊल उचललं असतं तर ही वेळ आली नसती असं काहींचं म्हणणं आहे.
राजू सापते यांनी हा व्हिडिओ पुण्याच्या राहत्या घरातून केला. हा व्हिडिओ आल्यानंतर मनोरंजनसृष्टीतल्या अनेकांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कुणाचेच फोन घेतले नाहीत. काळजीपोटी त्यांची पत्नी मुंबईहून शुक्रवारी रात्री पुण्याच्या घरी गेल्या. त्यावेळी घरचा दरवाजा उघडल्यानंतर राजू यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.