Pune Girish Bapat News: पुण्यातून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करा; गिरीश बापटांची मागणी
खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पुणे विमानतळावरून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची विनंती केली आहे

Pune Girish Bapat News: पुणेकरांची विमानाचा वाढता आंतरराष्ट्रीय प्रवास लक्षात घेऊन खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पुणे विमानतळावरून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची विनंती केली आहे. पुणे हे भारतातील आठव्या क्रमांकाचे मोठे महानगर मानले जाते. पुणे शहराच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान, उत्पादन आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात, असं खासदार गिरीश बापट यांनी सांगितलं.
बजाज ऑटो, जनरल मोटर्स, मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन आणि फोर्स मोटर्स यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपन्यांनी पुणे, महाराष्ट्राजवळ त्यांच्या ग्रीनफिल्ड सुविधा उभारल्या आहेत. पुणे शहरात इन्फोसिस, टीसीएस आणि कॅपजेमिनी, आयबीएम, रॉकवेल ऑटोमेशन, टेक महिंद्रा सारख्या अनेक नामांकित आयटी कंपन्यांचे हब आहे.
अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आणि संशोधन केंद्रे असल्यामुळे पुण्याचे वर्णन ऑक्सफर्ड ऑफ इस्ट असं केलं जातं. पुणे शहर देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र बनलं आहे. त्यामुळे पुण्यातून परदेशात आणि परदेशातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या आधी पुण्यातून चारपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे होती. मात्र सध्या पुण्यातून एकच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. त्नायामुळे गरिकांना मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून प्रवास करावा लागतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं आणि वेळेचा अपव्यय होतो, असंही बापट म्हणाले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, नागरिक आणि विविध विभाग मला पुण्याहून सिंगापूर, बँकॉक, पूर्व आशिया, युरोप आणि अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची सतत विनंती करत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी पुण्यातून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची विनंती केली आहे, असंही त्यांनी सांगितलं. पुण्यात महाराष्ट्रच नाही तर इतर अनेक राज्यातून लोक येतात. पुढील शिक्षणासाठी विविध संधी उपलब्ध आहेत. अनेक महत्वाच्या संस्था, विद्यापीठ, कंपन्या असल्याने कर्मचाऱ्यांना जास्तीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे ही मागणी करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
