Mumbai Pune Expressway: मोठी बातमी: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज विशेष ब्लॉक, वाहतूक कोणत्या वेळेत बंद राहणार?
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज (मंगळवारी, ता १६ ) दुपारी २ ते ३ वाजता मुंबई-पुणे हायवे भतानजवळ (एक तास) वाहतूक बंद राहणार आहे. पोलिसांनी पर्यायी मार्ग दिले आहेत, त्याचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज (मंगळवारी, ता १६ ) दुपारी २ ते ३ वाजता मुंबई-पुणे हायवे भतानजवळ (एक तास) वाहतूक बंद राहणार आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज तासभरासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) तर्फे भातन-अजिवली वाहीनीचे २२ केव्ही वीजवाहिन्यांचे आणि फिडर टाकण्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (Special block on Mumbai-Pune Expressway today)
वाहतूक बंदीचा कालावधी दुपारी २ वाजेपासून ३ वाजेपर्यंत असणार आहे. या दरम्यान कि.मी. ०९.६०० ते कि.मी. ०९.७०० या दरम्यान मुंबई आणि पुणे लेनवर सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच अवजड) वाहतूक पूर्णतः थांबवण्यात येईल. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके यांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम ११५ आणि ११६ नुसार ही अधिसूचना जारी केली असून, वाहनचालकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
पर्यायी मार्ग :
१. मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहने कळंबोली सर्कल (जेएनपीटी रोड डी पॉईंट, पळस्पे) येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर वळवली जातील.
२. तसेच शेड्रग एक्झिट (कि.मी. ०८.२००) येथूनही महामार्ग क्र. ४८ वर वळवले जाऊन खालापूर टोल नाका (कि.मी. ३२.२००) आणि मॅजिक पॉईंट (कि.मी. ४१.२००) येथून पुन्हा द्रुतगती मार्गावर प्रवेश मिळेल.
३. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना खोपोली एक्झिट (कि.मी. ३९.१००) वरून महामार्ग क्र. ४८ वर वळवले जाईल.
४. तसेच खालापूर टोल नाका एक्झिट (कि.मी. ३२.६००) येथून पाली ब्रीज मार्गे महामार्ग क्र. ४८ वर वाहने वळवली जातील.
हा बंदोबस्त फक्त वीजवाहिनीच्या नियोजित कामकाजादरम्यानच राहणार असून, काम पूर्ण होताच वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येईल. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुणे शहरातील सहा रस्त्यांवर पे अँड पार्क करण्याचा महापालिकेचा विचार
पुणे शहरातील सहा रस्त्यांवर पे अँड पार्क करण्याचा महापालिकेचा विचार सुरू आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेडून हॉल्टिंग झोनची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. सहा प्रमुख रस्त्यांवर पे अँड पार्क, नो पार्किंग आणि नो हॉल्टिंग झोनची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.
या रस्त्यांवर होणार पे अँड पार्क
-जंगली महाराज रस्ता
-लक्ष्मी रस्ता
-फर्ग्युसन रस्ता
-बालेवाडीतील हाय स्ट्रीट
-विमाननगर
-बिबवेवाडी
हे रस्ते महापालिकेच्या नो हॉकर्स झोनमध्ये मोडतात. या रस्त्यांवरील पथारी व्यावसायिकांच्या प्रश्नांवर वेंडिंग कमिटीमध्ये चर्चा करूनच अंमलबजावणी होणार आहे. या रस्त्यांवरील नागरिकांकडून १०, १५ व २० रुपयांचे शुल्क आकारले जाणार असून, दुचाकींसाठी तासाला २, ३ आणि ४ रुपये इतके दर लागू होणार आहेत.
























