Amol Kolhe Vs Adhalrao Patil : काही लोकं फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेलेत; अमोल कोल्हेंचा आढळरावांवर घणाघात!
अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा नाव न घेता शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर हल्ला केला आहे. माजी खासदार केवळ आपला व्यापार सांभाळण्यासाठी संसदेत निवडून जात होते, असा आरोप कोल्हे यांनी केला आहे.
ओतूर, पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास (Shirur Loksabha election ) आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि महायुतीचे उमेदवार आढळराव पाटलांमध्ये (Adhalrao Patil) शाब्दिक चकमक सुरुच असल्याचं दिसत आहे. प्रत्येक सभेत एकमेकांवर थेट आरोप करताना दिसत आहे. त्यातच अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा नाव न घेता शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर हल्ला केला आहे. माजी खासदार केवळ आपला व्यापार सांभाळण्यासाठी संसदेत निवडून जात होते, असा आरोप कोल्हे यांनी केला आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्योजक असल्याने त्यांचे व्यवसाय संरक्षण खात्याशी निगडित आहेत. त्यामुळे आढळराव पाटील यांनी त्यांचे व्यवसाय सांभाळण्यासाठी संरक्षण खात्याविषयी संसदेत 70 पेक्षा अधिक प्रश्न विचारले आहेत ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी विचारले. कोणते सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार ? कोणते कंत्राट कधी निघणार ? अशा प्रकारचे प्रश्न विचारून कोणत्या कंपनीचा फायदा करण्यासाठी हे प्रश्न विचारले, त्यामुळे कोणत्या कंपनीला फायदा झाला. याची माहिती घेतल्यावर समजले की, माजी खासदार आढळराव पाटील केवळ आपला व्यापार करण्यासाठी संसदेत गेले असल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणात केला आहे.
2019 साली जेव्हा मी संसदेत मी निवडून गेलो तेव्हा मी नवीन होतो म्हणून मी माहिती घेतली की, यापूर्वी खासदार असलेल्या महोदयांनी नेमके संसदेत कोणते प्रश्न विचारले आहेत. तेव्हा समजलं की, काही लोकं केवळ आपला व्यवसाय करण्यासाठी संसदेत गेले. शिरुर, जुन्नर, आंबेगाव, खेड या भागात ज्या खात्याचा काहीही संबंध नाही त्या खात्याचे संसदेत प्रश्न मांडण्याचा नेमका हेतू काय असावा असा सवालही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. संसदेत सामान्य जनतेचे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची आवश्यकता असताना मात्र केवळ व्यापार करण्यासाठी माजी खासदार संसदेत गेले असल्याचे पुन्हा अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
अजित पवारांवरदेखील निशाणा
माझ्यासारख्या कार्यकर्त्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, बिबट्यांचा शेतकऱ्यांना होणारा त्रास यावर आवाज उठवला, ही चूक केली का? असा सवाल विचारत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) आव्हान दिलंय. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला पाडण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांना जर मर्दुमकी दाखवायची असेल तर ती दिल्लीत दाखवावी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असं अमोल कोल्हे म्हणाले. सर्वांना आव्हान द्या, पण बापाला आव्हान द्यायचं नसतं असा टोलाही त्यांनी लगावला.
इतर महत्वाची बातमी-
कुठे ऊन, कुठे पाऊस! ठाणे, मुंबईत उन्हाच्या झळा, IMD कडून यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस