(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात शरद पवारांची उपस्थिती, मात्र उद्घाटन सोहळ्याला अजित पवारांची दांडी
पुण्यातील नाट्य संमेलनात (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) राजकीय नाट्याचा पहिला अंक झाला. आज पिंपरी चिंचवड शाखेच्या नाट्य संमेलनात राजकीय नाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळाला आहे.
पुणे : पुण्यातील नाट्य संमेलनात (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) राजकीय नाट्याचा पहिला अंक झाला. आज पिंपरी चिंचवड शाखेच्या नाट्य संमेलनात राजकीय नाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळाला आहे.100 व्या नाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमात शरद पवार, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. मात्र, उद्घाटन सोहळ्याला अजित पवार आलेच नाहीत. त्यामुळे एकाच मंचावर शरद पवारांसोबत येणं अजितदादांनी पुन्हा टाळल्याच्या चर्चांनाा उधाण आले आहे.
कालच्या पुण्यातील नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाचे आमंत्रणचं मिळाले नव्हते, असं म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आजच्या पिंपरीतील उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार असल्याचं कळवलं आहे. तसेच काल पुण्यातील नाट्य संमेलनाला ऐनवेळी अनुपस्थित राहिलेले शरद पवार आज पिंपरीतल्या नाट्य संमेलनाला उपस्थित राहिले. त्यामुळं काका - पुतण्याच चाललय तरी काय असा सवाल राज्यातील जनतेला पडला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांचा सत्कार
अजित पवारांनी दांडी मांडलेल्या संमेलनाच्या मंचावर मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांचा सत्कार पार पडला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीचं हा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. सूत्रसंचालकांनी ही तसं नमूद केलं. उद्घाटन सोहळ्याच्या नियोजनात हा सत्कार नमूद नव्हता. अजित पवारांनी ज्यांच्यामुळं मंचावर येणं टाळलं, त्याच शरद पवारांचा सत्कार करण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्यानं उपस्थितांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली.
शरद पवार आणि अजित पवारांमधील दूरावा वाढला
नाट्यसंमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेमुळे काका पुतणे एकाच मंचावर येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. याआधी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले होते. पण काल पुण्याच्या कार्यक्रमाला दोघांनीही गैरहजर राहणं पसंत केलं. त्यानंतर आज ते एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र आजच्या कार्यक्रमला शरद पवार उपस्थित राहिले मात्र अजित पवारांनी मात्र उपस्थित न राहणे पसंद केले आहे. दोन्ही घटनानंतर शरद पवार आणि अजित पवारांमधील दूरावा वाढल्याचे दिसून येत आहे
रंगकर्मींच्या अनेक समस्या नेतेमंडळी सोडवण्याची अपेक्षा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant), सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) या राजकीय नेतेमंडळींचा समावेश आहे. नाट्य संकुलासाठी आवश्यक निधी मिळण्यापासून ते राज्यातील सर्व नाट्यगृहांची दूरावस्था, नवोदित कलाकारांच्या राहण्याची सोय अशा रंगकर्मींच्या अनेक समस्या नेतेमंडळी सोडवतील, अशी आशा आहे.
हे ही वाचा :