Vinod Tawde: मी शरद पवारांसोबत असेन, पवार साहेब मोदींकडून अनेक गोष्टी करुन घेऊ शकतात: विनोद तावडे
Maharashtra Politics: विश्वास पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर लिहलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला शरद पवार आणि विनोद तावडेंची उपस्थिती. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात रंगला कार्यक्रम.
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या विश्वास पाटील लिखित 'अण्णाभाऊ साठे - दलित आणि महिलांचे कैवारी' या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी विनोद तावडे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजकारणाबाबत भाष्य करताना म्हटले की, शरद पवार अनेकदा कुठे झोत टाकतात, हे शोधण्यात सगळ्यांचा वेळ जातो. महाराष्ट्रातील राजकारण प्रगल्भ होतं, हे मी जाणीवपूर्वक म्हणतो. पूर्वी विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करायचे. मात्र, विरोधक आणि सत्ताधारी तेव्हा एकत्र बोलायचे, जेवायचेदेखील. मात्र, आता हे चित्र दिसत नाही, असे विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी म्हटले. महाराष्ट्रात दोन तुकाराम होऊन गेले एकाच्या पोवाड्याने आणि दुसऱ्यांच्या अभंगाने महाराष्ट्र प्रगल्भ झाला. अण्णाभाऊ साठे यांच्यावरील या ग्रंथाचं इतर भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी मी शरद पवार यांच्यासोबत असेन. मोदी साहेबांकडून पवार साहेब अनेक गोष्टी करुन घेऊ शकतात. त्यामुळे मी या कामात शरद पवार यांना मदत करेन, असे विनोद तावडे यांनी म्हटले.
अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी खूप मोठं काम केले आहे. या चळवळीत त्यांचं वेगळं योगदान होते. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला केवळ दलित साहित्य म्हणणं हा त्यांच्यावर अन्याय वाटतो. क्रांतीच्या ठिणग्या अण्णभाऊ साठेंच्या लिखाणात पाहायला मिळतात. त्यांनी आपल्या लिखाणातून सहजपणे समाजातील ढोंगीपणावर वक्तव्य केलंय. ओटीटीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य समोर आले पाहिजे. जेणेकरुन तरुण पिढीला अण्णाभाऊ साठे कळतील. हे साहित्य केवळ एका दलित वर्गाचं आहे असं न मानता ते देशाचं आहे, असं मानून भारतभर हे साहित्य पोहोचवणे गरजेचे असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी करायची वेळ येते, हे दुर्दैवी: शरद पवार
मराठी क्षेत्रात विश्वास पाटील यांनी किती योगदान दिलं, हे सांगण्याची गरज नाही. त्यांनी पानिपत राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचवलं आहे. आता त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल लिहलं आहे. अण्णाभाऊ साठे याचं लिखाण प्रसिद्ध झाले, त्याचा प्रकाशन सोहळा पुण्यात होतो, सगळा वर्ग इथ झाडून आला आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
शरद पवार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर आणि साहित्याची महती सांगताना त्यांच्या संघर्षमयी जीवनाचा उल्लेख केला. अण्णाभाऊ जिथं राहत होते तो तालुका शिराळा,संघर्ष करणारा. तिथून अण्णांच्या संघर्ष करण्याला सुरुवात झाली. स्वातंत्र्यसैनिकांच्या साताऱ्यातून ते आले. अण्णाभाऊ प्रतिकूल परिस्थितीतून आलेले,ते मुंबईला चालत गेले. मुंबईत त्यांनी गिरणी कामगारांची एक जबरदस्त चळवळ उभी केली. प्रत्येक लिखाणात त्यांना भरपूर मान्यता मिळाली. माझी मैना गावाकडे राहिली...हे काव्य अनेकदा त्या काळात ऐकायला मिळत होते.
साम्यवादी विचारांनी आकर्षित झाले,अनेक बैठकीला ते उपस्थितीत राहत होते. अनेक नेत्यांना त्यांच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले. त्यातून त्यांना रशियाला जायची संधी मिळाली. आनंद आहे विश्वास पाटील यांनी उत्तम लिखाण लिहलेले आहे. अन्य भाषेत रूपांतर झालं पाहिजे, तसे प्रयत्न करतील, देशात त्याच लिखाण पोहचले पाहिजे यासाठी प्रयत्न केला जाईल. भारतरत्न मिळावा यासाठी मागणी करावी लागते हे दुर्दैव आहे. माहिती पुरवून अण्णाभाऊ यांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्न करू, असे शरद पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा