Baramati : शरद पवारांच्या कार्यकर्त्याचा नाद खुळा! 'तुतारी'च्या प्रचारासाठी भाऊने तयार केली चक्क 'चांदीची टोपी'!
शरद पवार यांच्या कार्यकर्त्याने चक्क चांदीची टोपी तयार केली आहे.
पुणे : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा झाल्यापासून देशासह महाराष्ट्रातही प्रचाराची धूम आहे. वेगवेगळे पक्ष पूर्ण ताकदीने आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. या प्रचारमोहिमेत कार्यकर्तेदेखील मागे नाहीत. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेणे, आपल्या नेत्यासाच्या वेगवेगळ्या गोष्टींचे नियोजन करणे अशी जमेल ती कामे हे कार्यकर्ते करत आहेत. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अशाच एका खंद्या कार्यकर्त्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. त्याने शरद पवार यांच्या पक्षाचे चिन्ह सर्व लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.
बारामतीत नणंद विरुद्ध भावजई
गणेश नवले (Ganesh Nawale) असे शरद पवार यांच्या या कार्यकर्त्याचे नाव आहे. ते मुळचे बारामतीचे रहिवासी आहेत. बारामती (Baramati) मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाकूडन सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार आहेत. तर महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार आहे. या जागेवर नणंद विरुद्ध भावजई अशी लढत होणार आहे. त्यामुळे या जागेची सध्या सगळीकडे चर्चा असून विजयासाठी दोन्ही बाजूने चांगलाच जोर लावला जातोय.
तयारी केली चक्क चांदीची टोपी
आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करा. प्रचार करा, असे वरिष्ठांकडून सांगितले जात आहे. त्याचेच पालन कार्यकर्ते करताना दिसतायत. यामध्ये गणेश नवले यांचादेखील समावेश आहे. त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी चक्क चांदीची टोपी तयार केली आहे.
टोपीमध्ये नेमकं काय आहे?
नवले यांनी तयार केलेली टोपी साधीसुधी नाही. ती चांगलीच मोठी आहे. विशेष म्हणजे तिला डोक्यावर घालता येते. या टोपीच्या एका बाजूला पवार साहेब आणि दुसऱ्या बाजूला ताईसाहेब असे लिहिलेले आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी हे चिन्हदेखील या टोपीवर कोरण्यात आले आहे. नवले ही टोपी डोक्यावर घालून सुप्रिया सुळेंचा प्रचार करत आहेत.
चांदीच्या टोपीच्या माध्यमातून तुतारी चिन्हाचा प्रचार
दरम्यान, निवडणुका जवळ आल्या की कार्यकर्ता पक्षाचा प्रचार करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरतो. गणेश नवले यांनी वापरलेल्या या फंड्याची सध्या संपूर्ण बारामतीत चर्चा होत आहे. या टोपीच्या माध्यमातून गणेश नवले हे शरद पवार यांच्या पक्षाच्या तुतारी या चिन्हाचा प्रचार करत आहेत. ते इस्त्रीचे दुकान चालवतात.