Vijay Shivtare: मोठी बातमी : विजय शिवतारेंनी दुसरा पत्ता टाकला, वेळ पडल्यास भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार
Baramati Loksabha: बारामती लोकसभेची लढत यंदा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. याठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. मात्र, विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात भूमिका घेऊन महायुतीची अडचण वाढवली आहे.
पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात पवार घराण्याविरोधात लढण्याची नियतीने दिलेली असाईनमेंट पूर्ण करण्यासाठी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आपण वेळ पडल्यास कोणत्याही मार्गाचा अवलंब करायला तयार असल्याचे संकेत दिले आहेत. विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवतारे यांनी आपण वेळ पडल्यास बारामतीमध्ये (Baramati Loksabha) भाजपच्या कमळ चिन्हावरही लढू, असे सांगत आपला दुसरा पत्ता टाकला आहे. विजय शिवतारे यांचे हे वक्तव्य म्हणजे नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना, अशी शंका आता उपस्थित झाली आहे.
विजय शिवतारे यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले. अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यातील जनतेचे नुकसान केले आहे. त्यामुळे मला पवार घराण्याविरोधातील मतं मिळतील. माझ्यावर शिवसेना पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई झाली तरी मी बारामतीची लोकसभा निवडणूक लढवणारच, असे विजय शिवतारे यांनी ठणकावून सांगितले. मी शंभुराज देसाई यांना माझी भूमिका सांगितली आहे. ते माझं म्हणणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार आहेत. मी एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट सांगितली होती. पण त्यांनी म्हटले की, महायुतीत बारामतीची जागा अजित पवार गटाला सुटली आहे. पण सुनेत्रा पवार पराभूत होणार आहेत. त्यामुळे महायुतीचे नुकसान करण्याऐवजी ही जागा शिवसेनेला द्यावी. मी धनुष्यबाणाच्या चिन्हावर बारामती लोकसभेची निवडणूक जिंकून दाखवेन, असा दावा विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर केला होता. परंतु, त्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी बारामतीची जागा शिवसेनेसाठी मागून घेण्याविषयी असमर्थता व्यक्त केली होती. आपल्याला युतीधर्माचे पालन करावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांना सांगितले होते.
विजय शिवतारे यांच्यावर शिवसेनेकडून शिस्तभंगाची कारवाई होणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजवल्यानंतरही विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात टीका करणे सुरुच ठेवले आहे. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन केलं होतं. या बैठकीला विजय शिवतारे यांना हजर राहण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, शिवतारे या बैठकीकडे फिरकले पण नाहीत. विजय शिवतारे यांनी ही भूमिका बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. तसेच त्यामुळे अजितदादा गट आणि शिंदे गटातील तणावही वाढू शकतो. त्यामुळे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांकडून विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा