D. Y. Patil College : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा MBA परीक्षेचा पेपर फुटला; विद्यापीठाकडून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे घेतला जाणारा एम बी ए च्या लीगल एसपेक्ट ऑफ बिझनेस या विषयाचा पेपर फुटलाय. शुक्रवारी 22 डिसेंबरला ही बाब समोर आली आहे .
D. Y. Patil College : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा (Savitribai Phule Pune University) विभागातर्फे घेतला जाणारा एम बी ए च्या लीगल एसपेक्ट ऑफ बिझनेस (legal aspects of business) या विषयाचा पेपर फुटलाय. शुक्रवारी 22 डिसेंबरला ही बाब समोर आली आहे . एमबीए प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राचा हा पेपर होता. चिखली येथील डी वाय पाटील कॉलेज येथून प्रश्नपत्रिका फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे पुणे , अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये संलग्न महाविद्यालयातील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. ऑक्टोबर 2023 या सत्राची परीक्षा 21 नोव्हेंबर पासून सुरळीतपणे सुरू झाली आहे. त्यात एमबीए अभ्यासक्रमाची परीक्षा 11 डिसेंबर पासून सुरू झाली आहे. 22 डिसेंबर रोजी MBA 2009 रिवाईज प्रथम सत्रातील लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची परीक्षा सकाळी 11 वाजता सुरू होणार होती. परंतु तत्पूर्वीच या विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार
विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University)घेतल्या जाणाऱ्या लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यापीठाने हा पेपर रद्द केला आहे. चिखली येथील डी वाय पाटील कॉलेजमधून या विषयाची प्रश्नपत्रिका लीक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे, असंसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे (Mahesh Kakde) यांनी सांगितलं आहे.
परिक्षा कधी होणार?
परीक्षेचे संवेदनशीलता गोपनीयता व पवित्र लक्षात घेता विद्यापीठाने पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी पेपर फुटीची घटना समोर आल्यामुळे रद्द करण्यात आलेला पेपर आता येत्या 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 : 30 या वेळेत घेतला जाणार आहे, असं सांगण्यात आलं आहे.