Sadhabhau Khot : महात्मा गांधींच्या विचारांचा खून नेहरूंनी केला; सदाभाऊ खोतांचं मोठं वक्तव्य
महात्मा गांधी यांचा खून माथेफिरु नथुराम गोडसे यांनी केला मात्र नेहरूंनी महात्मा गांधींच्या विचारांचा खून केला, असं मोठं वक्तव्य राज्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
Sadhabhau Khot : महात्मा गांधी (Mahatma gandi) यांचा खून माथेफिरु नथुराम गोडसे यांनी केला. मात्र नेहरूंनी महात्मा गांधींच्या विचारांचा खून केला, असं मोठं वक्तव्य राज्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केलं आहे. ते पुण्यातील युवा संसदमध्ये आयडिया ऑफ इंडियाच्या सत्रामध्ये बोलत होते. महात्मा गांधी यांचा खून माथेफिरु नथुराम गोडसे यांनी केला ही बाब निषेधार्ह आहे, असंही ते यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, आपल्या देशामध्ये सध्या इंडिया आणि भारत दोन प्रकारचे देश आहेत. यामध्ये भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी हे कायम खेड्यांकडे चला असा विचार मांडत होते, परंतु पंडित नेहरू यांनी या विचारांचा खून केला. युरोप आणि अमेरिकेच्या विचारांनी प्रभावी झालेल्या पंडित नेहरूंनी खेड्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खेडी भकास झाली आणि शेतकरी उद्धवस्त झाला. महात्मा गांधी यांचा खून माथेफिरु नथुराम गोडसे यांनी केला ही बाब निषेधार्ह आहे, मात्र महात्मा गांधी यांच्या विचारांचा खून पंडित नेहरु यांनी केला हे स्विकारावेच लागेल,असं ते म्हणाले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कष्ट करून देशाचा विकास केला. मात्र इंडियातील उद्योजकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करून देशाची लुबाडणूक केली. अशीच व्यवस्था कायम राहिली तर देशामध्ये समान विकास कसा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारा विकास आपण निर्माण केला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
"बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळलो"
सामाजिक कामाच्या नावाखाली बारामतीकर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबाची सत्ता अनुभवत आहेत. परंतु हे कुटुंब मात्र आपण सामाजिक काम करत आहोत असा देखावा करत स्वतःचेच खिसे भरत आहेत. कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने शैक्षणिक संस्था निर्माण करून या कुटुंबाने बारामतीकरांना वाऱ्यावर सोडले. यामुळे बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागले आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
आयडिया ऑफ इंडिया या विषयावर चर्चा
युवा संसदमध्ये आयडिया ऑफ इंडिया यावर चर्चा करण्यात आली . त्यावेळी अनेकांनी त्यांची मतं मांडली. आमदार गोपीचंद पडळकर, इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, विद्यार्थी नेता पार्थ पटले, कुणाल दंडवते यावेळी उपस्थित होते. सरपंचांचादेखील सहभाग होता. त्यांनीदेखील गावासाठीच्या नव्या योजनांबाबत चर्चा केली.