Home Loan EMI : गृहकर्जदारांना मोठा धक्का, स्टेट बँक ऑफ इंडियासह आणखी एका सरकारी बँकेनं व्याज दर वाढवले
SBI Home Loan : आरबीआयनं ऑगस्ट महिन्याचं पतधोरण जाहीर करत रेपो रेटमध्ये कोणतीही कपात किंवा वाढ केली नव्हती. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं गृहकर्जाचे व्याज दर वाढवले आहेत.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण विषयक समितीनं 6 ऑगस्ट 2025 ला रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करता ते स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानंतर आता भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं गृहकर्जावरील व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं गृहकर्जाच्या व्याज दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियानं हा निर्णय नव्या कर्जदारांसाठी लागू केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 ऑगस्ट 2025 पासून केली जाणार आहे. त्यामुळं नव्यानं गृहकर्ज घेणाऱ्यांना अधिक EMI द्यावा लागेल. द इकोनॉमिक टाइम्सच्यारिपोर्टनुसार आता स्टेट बँक ऑफ इंडिया गृह कर्ज 7.50 टक्के ते 8.70 टक्के दरानं देईल.
स्टेट बँक ऑफ इंडियानं व्याजदरात कमाल 25 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. गृहकर्ज 7.50 टक्के ते 8.45 टक्के या व्याज दरानं दिलं जात होतं. मात्र आता नव्या कर्जदारांना हे कर्ज 7.50 टक्के ते 8.70 टक्क्यांनी दिलं जाईल. स्टेट बँकेनं किमान व्याज दर कायम ठेवलाय तर कमाल व्याज दरात वाढ केली आहे. स्टेट बँकेनं योनो इन्स्टा होम टॉप अप लोन 8.35 टक्के ठेवलं आहे. एक्स्टर्नल बेंचमार्क लेंडिग रेट 8.15 टक्के ठेवला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरणविषयक समितीची बैठक 4 ते 6 ऑगस्ट 2025 दरम्यान पार पडली होती. या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करता 5.5 टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर गृहकर्जाच्या व्याज दरात वाढ केली जात आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियानं गृहकर्जाच्या व्याज दराची कमाल मर्यादा वाढवली आहे. याचा थेट परिणाम जे कर्जदार कमाल व्याज दर पर्याय निवडून कर्ज घेतील त्यांना अधिक दरानं व्याज द्यावं लागेल. ज्या कर्जदारांची क्रेडिट प्रोफाईल किंवा कर्ज प्रवर्ग अप्पर स्लॅबजवळ असेल त्यांना अधिक ईएमआय द्यावा लागेल. 25 बेसिस पॉईंटनं व्याज दर वाढला तरी ईएमआयवर परिणाम होऊ शकतो.
जर एखाद्या कर्जदारानं 30 लाखांचं कर्ज 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेतलं असेल. तर त्यांचा मासिक कर्जाचा हप्ता 8.45 टक्क्यानुसार 25830 रुपये असेल. यामध्ये 25 बेसिस पॉईंटची वाढ झाल्यास 26278 रुपये दरमहा ईएमआय द्यावा लागेल. म्हणजेच दरमहा 450 रुपये अधिक EMI द्यावा लागेल. कर्जाच्या पूर्ण कालावधीचा विचार केल्यास एकूण 1 लाख रुपये द्यावे लागतील.
यूनियन बँक ऑफ इंडियानं गृहकर्जाचा व्याज दर 7.35 टक्क्यांवरुन वाढवून 7.45 टक्के केला आहे. एचडीएफसी बँकेचा गृहकर्जाचा व्याज दर 7.90 टक्के, आयसीआयसीआय बँक 8 टक्के आणि अॅक्सिस बँक 8.35 टक्के आहे.
एचडीएफसी बँकेच्या गृहकर्जाच्या वितरणात पहिल्या तिमाहीत 7 टक्के वाढ झाली आहे. तर, आयसीआयसीआय बँकेच्या गृहकर्जाच्या पोर्टफोलिओत 10.30 टक्के वाढ झाली आहे. खासगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँकांनी गृहकर्ज वितरणात चांगली कामगिरी केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गृहकर्ज पोर्टफोलिओत 14 टक्के आणि बँक ऑफ बडोदाच्या गृहकर्ज पोर्टफोलिओत 18 टक्के वाढ झाली आहे.

























