Rohit pawar : तर कराडच्या समाधीस्थळी जाऊन आत्मक्लेश करण्याची गरज नाही; क्रिकेटच्या मैदानातून रोहित पवारांची अजितदादांवर राजकीय फटकेबाजी
रोहित पवारांना नेमकं कोणतं मैदान आवडतं? राजकीय की क्रिकेटचं? जर राजकीय संघ क्रिकेटच्या मैदानात उतरला तर त्यांना कोणत्या राजकीय नेत्यांच्या विरोधात खेळायला आवडेल? ? या सगळ्याची उत्तर रोहित पवारांनी दिली आहे.
पुणे : क्रिकेट वर्ल्डकपचा फिव्हर देशावर चढला आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारही वर्ल्डकपच्या मैदानात उतरले आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर वर्ल्डकपचे पाच सामने होणार आहेत. त्याची जबाबदारी एमसीएचे अध्यक्ष रोहित पवारांच्या खांद्यावर आहे. त्याच रोहित पवारांना नेमकं कोणतं मैदान आवडतं? राजकीय की क्रिकेटचं? जर राजकीय संघ क्रिकेटच्या मैदानात उतरला तर त्यांना कोणत्या राजकीय नेत्यांच्या विरोधात खेळायला आवडेल? त्याच सामन्यात अजित दादा कोणत्या संघातून खेळतील? तुमच्या की विरोधी? या सगळ्याची उत्तर रोहित पवारांनी दिली.
रोहित पवारांना कोणतं मैदान आवडतं?
क्रिकेटच्या मैदानाची एक खासियत आहे. हे मैदान प्रथा बदलत नाही आणि प्रथा बदलण्याचा प्रयत्न देखील कोणी करत नाही. सगळ्या टीम चांगल्या पद्धतीने खेळतात. जिंकणाऱ्या टीमचं अभिनंदन विरोधातली टीम करते आणि पुन्हा खेळाचा सराव करायला सुरुवात करतात. मात्र आजची राजकारणाची पातळी खालावली आहे. त्यामुळे राजकारणापेक्षा क्रिकेटचं मैदान जास्त चांगलं वाटतं आणि राज्यकर्त्यांनी या क्रिकेटच्या खेळाडूंकडून प्रेरणा घेतली पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले. राज्यकर्त्यांसोबत क्रिकेटचे सामने करायचे असेल तर एका संघाची गरज आहे. आमचा संघ तयार आहे. भाजपत गेलेल्यांनी आपला संघ तयार करावा आणि खेळावे. कोणताही संघ खेळू दे मात्र टाळ्या आमच्याच संघाला मिळेल. राजकारणातील कोणत्याही नेत्याने बॉलिंग करायला आलं तर आम्ही प्रामणिकपणे हा खेळ खेळू, असंही त्यांनी सांगितलं.
कराडच्या समाधीस्थळी जाऊन आत्मक्लेश करण्याची गरज नाही....
अजित पवारांच्या सभेत यशवंत चव्हाण साहेबांचे फोटो दिसत आहेत. त्याच चव्हाण साहेबांना शरद पवार यांनी गुरू मानलं. त्यांच्या प्रेरणेने पवार साहेब राजकारण करतात. आता पवार साहेबांचा फोटो वापरता, येईना म्हणून चव्हाण साहेबांचा फोटो वापरत आहेत. आता चुकीच्या पद्धतीने काम केलं तर कराडच्या समाधीस्थळी जाऊन आत्मक्लेश करण्याची गरज नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या फोटो समोर बसून केलं तरी चालेल, असं म्हणत त्यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे.
शरद पवारांवरचे आरोप अशोभनीय....
शरद पवार साहेबांनी अनेकांना मंत्री पद दिली. अधिकार ही दिले. त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप केला नाही. पण आज ते विरोधी गटात स्वार्थासाठी गेले आणि तिथं जाऊन म्हणतात पवार साहेब आमचं चालून देत नव्हते. पवार साहेब हे हुकूमशाही पद्धतीने काम करतात असं म्हणतात, हे अशोभनीय आहे, असा टोला त्यांनी अजित पवार गटातील नेत्यांना लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या