ऑक्सिजन सिलेंडरचा आवाज होत असल्याने हॉस्पिटलवर रहिवाशांची दगडफेक, पुण्यातील धक्कादायक प्रकार
या हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे 16 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर 3 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे या रुग्णालयात ऑक्सिजनची प्रचंड मागणी असते. त्यामुळे दररोज दोन ते तीन वेळेस ऑक्सिजन सिलेंडर घेऊन गाडी येत असते.
![ऑक्सिजन सिलेंडरचा आवाज होत असल्याने हॉस्पिटलवर रहिवाशांची दगडफेक, पुण्यातील धक्कादायक प्रकार Residents throw stones at hospital due to noise of oxygen cylinder in pune ऑक्सिजन सिलेंडरचा आवाज होत असल्याने हॉस्पिटलवर रहिवाशांची दगडफेक, पुण्यातील धक्कादायक प्रकार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/19044050/WhatsApp-Image-2020-08-18-at-11.04.07-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : ऑक्सिजन सिलेंडरचा आवाज होत असल्याच्या कारणावरून कोरोनाचे रुग्ण असलेल्या हॉस्पिटलवर लगतच्या रहिवाशांनी दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खराडी येथील रायझिंग केअर हॉस्पिटलसोबत हा प्रकार घडला. चंदननगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या खराडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्याच्या खराडी परिसरात हे हॉस्पिटल आहे. जून महिन्यापासून याठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. या हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे 16 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर 3 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे या रुग्णालयात ऑक्सिजनची प्रचंड मागणी असते. त्यामुळे दररोज दोन ते तीन वेळेस ऑक्सिजन सिलेंडर घेऊन गाडी येत असते. गाडीतून सिलेंडर बाहेर काढताना, रिकामे सिलेंडर आत टाकताना आवाज होतो. यावर रुग्णालयालगत राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेत अनेकदा हॉस्पिटल प्रशासनासोबत वाद घातला होता. परंतु सोमवारी येथील स्थानिक नागरिकांनी टोकाची भूमिका घेत हॉस्पिटलवर दगडफेक केली. या प्रकारानंतर रुग्णालयाचे व्यवस्थापक उमेश शिवाजी गिरी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या मजल्यावरून ड्रायव्हरच्या डोक्यावर कुंडी फेकण्याचा प्रयत्न
हॉस्पिटललगत असणाऱ्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून ऑक्सिजन सिलेंडर घेऊन येणाऱ्या टेम्पो चालकाच्या डोक्यावर भरलेली कुंडी फेकण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु सुदैवाने ही कुंडी गाडीवर पडल्यामुळे अनर्थ टळला. अन्यथा ड्रायव्हरचा कपाळमोक्ष झाला असता. या घटनेनंतर दोन तास सिलिंडर बदली झाले नव्हते. त्यामुळे रुग्णांचा जीवही धोक्यात आला होता. याआधीही स्थानिक नागरिकांनी याच कारणावरून रुग्णालयाचे गेट बंद करीत सुरक्षा रक्षकाला शिविगाळ केली होती.
वैद्यकीय कर्मचारी एकीकडे कोरोना संकटाशी दोन हात करत असताना त्यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून होणारा हा प्रकार दुर्दैवी आहे. इतक्या गंभीर प्रकरणानंतरही पोलिसांनी केवळ अदखलपात्र पात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Pune Covid Centre | पुण्यातील खराडीतील रुग्णालयावर स्थानिकांकडून दगडफेक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)