Ranjit Kasle: परळीत EVM सोबत छेडछाड, न बोलण्यासाठी 10 लाख पाठवले... होय, वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची धनंजय मुंडेंची ऑफर होती; निलंबित PSI रणजीत कासलेंनी पुरावा दाखवला
Ranjit Kasle Allegation On Dhananjay Munde : वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी आपल्याला कोट्यवधीची ऑफर होती असा दावा बीडमधील सायबर विभागाचे निलंबित पीएसआय रणजीत कासले यांनी केला आहे.

पुणे : परळीत ईव्हीएमसोबत छेडछाड करण्यात आली, त्यासाठीच मला बाजूला करण्यात आलं आणि नंतर अकाऊंटवर 10 लाख रुपये देण्यात आल्याचं निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी सांगितलं. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी धनंजय मुंडे यांची ऑफर होती असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. रणजीत कासले हे पुणे विमानतळावर आले आणि ते बीड पोलिसांना शरण जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये धनंजय मुंडेपासून ते मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत आणि बीड पोलिसांपासून ते आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांवर रणजीत कासले यांनी आरोप केले आहेत.
रणजीत कासले यांनी या आधी व्हिडीओच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावर कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी कोट्यवधीची ऑफर दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. आता रणजीत कासले हे पोलिसांना शरण जात आहेत.
वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्यांच्यावर 302 कलम लागले. त्यामुळे आपणही त्यामध्ये अडकू या भीतीने धनंजय मुंडेंनी कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली होती असा आरोप रणजीत कासले यांनी केला.
परळीतील निवडणुकीच्या दिवशी 10 लाख आले
रणजीत कासले म्हणाले की, निवडणुकीच्या दिवशी, 21 नोव्हेंबर रोजी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने माझ्या अकाऊंटवर 10 लाख रुपये आले. त्यानंतर परळीमध्ये ईव्हीएम ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी माझी ड्युटी होती. ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्ही यापासून दूर राहा असं वाल्मिक कराडने आपल्याला सांगितलं. लोकसभेवेळी मी बोगस मतदान होऊ दिलं नव्हतं. विधानसभेवेळी धनंजय मुंडे यांची कॅश पकडली होती. त्यामुळेच मला बाजूला करण्यात आलं. मला वरून आराम करण्याची ऑर्डर आली आणि ईव्हीएमच्या ड्युटीमधून बाजूला करण्यात आलं.
माझ्यावर गुन्हा दाखल नाही तरीही माझे लोकेशन ट्रेस केले जात होते, माणसे पाठवली जात होती. एका सूरतच्या बिल्डरच्या सांगण्यावरून निखिल गुप्ता, अतिरिक्त महासंचालक यांनी निलंबित केलं असा आरोप रणजीत कासले यांनी केला.
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर आपल्याला देण्यात आली होती असा आरोप रणजीत कासले यांनी केला. ते म्हणाले की, वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर चारच दिवसात काही वरिष्ठ अधिकारी आले आणि त्यांच्याकडून ही ऑफर आली. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना नको होते. कराड 302 मध्ये अडकले आहेत मी पण अडकेल ही भीती धनंजय मुंडे यांना असेल.
बोगस एन्काऊंटरचा पुरावा काय?
बोगस एन्काऊंटरचा निर्णय हा बंद दाराआड झालेला असतो, त्याला कोणताही पुरावा नसतो असं रणजीत कासले म्हणाले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि वरचे अधिकारी बोगस एन्काऊंटर संबंधी निर्णय घेतात. मग बंद दाराआड मला हा निर्णय सांगण्यात आला. तुम्ही वाल्मिक कराडच्या मागे रिव्हॉल्वर घेऊन राहा. कधी तो चुकेल त्यावेळी त्याचा एन्काऊंटर करा अशी ऑफर होती.
दोन वर्षात आपल्या सात बदल्या बीड जिल्ह्यात झाल्या. त्यामुळे मी वादग्रस्त अधिकारी आहे. त्यावर एकही विनंती अर्ज नाही. त्याचमुळे मला एन्काऊंटरची ऑफर आली असं रणजीत कासले म्हणाले. मला त्यावेळी योग्य वाटलं नाही. आरोपीला शिक्षा देण्यासाठी न्यायदेवता आहे. त्यामुळे मी ती ऑफर नाकारली असंही ते म्हणाले.
घरातील पुरावे शोधले
अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन पांडकर हे वाल्मिक कराडचे हस्तक आहेत. ते चार वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत असंही रणजीत कासले म्हणाले. ते म्हणाले की, "बीडमध्ये मी ज्या ठिकाणी राहतो त्या घराचे कुलुप तोडण्यात आलं आणि घरातील सर्व पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. इलेक्शनच्या दिवशी किडनॅप करुन मला बार्शीला सोडण्यात आलं. करुणा मुंडेच्या गाडीत दोन दोन रिव्हॉल्वर ठेवली, तर माझ्या घरी चोरी का करू शकणार नाहीत."
आता मला निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे हे सगळं बोलतोय. या आधी बोललो असतो तर आधीच निलंबित झालो असतो आणि उपासमार झाली असती असं रणजीत कासले म्हणाले.























