पराभूत उमेदवार आणि त्यांचा पक्ष निकालाविरोधात न्यायालयात अपील करु शकतात पण... : उल्हास बापट
प्रेफरेन्शियल व्होटची ही निवडणूक प्रक्रिया किचकट आहे. राजकीय पक्षांनी यातून हाच धडा घ्यायचाय की अशा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया योग्य पद्धतीने समजून घ्यायला हवी, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले.
Rajya Sabha Election 2022 : "प्रेफरेन्शियल व्होटची ही निवडणूक प्रक्रिया किचकट आहे. राजकीय पक्षांनी यातून हाच धडा घ्यायचाय की अशा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया योग्य पद्धतीने समजून घ्यायला हवी. पराभूत उमेदवार आणि त्यांचा पक्ष या निकालाच्या विरोधात न्यायालयात अपील करु शकतात. पण तिथे निकाल बदलेल असं वाटत नाही, त्यांनी न्यायालयाचा वेळ वाया घालवू नये," असा सल्ला घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
राज्यसभा निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. संध्याकाळी पाच वाजता सुरु होणारी मतमोजणीची प्रक्रिया मध्यरात्री एक वाजता सुरु झाली. याचं कारण म्हणजे भाजपने महाविकास आघाडीची तीन मतं अवैध ठरवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यावर निकाल देताना निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचं मत बाद ठरवलं.
निवडणुकीत निवडणूक आयोगाचं काम अंपायरिंगचं, आयोगाच्या हेतूबद्दल शंका घेऊ नये : उल्हास बापट
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविषयी एबीपी माझाने घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, "प्रेफरेन्शियल व्होटची ही निवडणूक प्रक्रिया किचकट आहे. मात्र त्याचा स्वीकार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकप्रतिनिधी ती समजून घेऊन मतदान करतील असे अपेक्षिले होते. राजकीय पक्षांनी यातून हाच धडा घ्यायचाय की अशा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया योग्य पद्धतीने समजून घ्यायला हवी. निवडणुकीत अंपायरिंगचे काम निवडणूक आयोगाकडे असते. निवडणूक आयोगाच्या हेतूबद्दल शंका घेऊ नये. ते घटनेत बसणारं नाही. पराभूत उमेदवार आणि त्यांचा पक्ष न्यायालयात या निकालाच्या विरोधात अपील करु शकतात. परंतु तिथे निकाल बदलेल असं वाटत नाही. त्यांनी न्यायालयाचा वेळ वाया घालवू नये."
सुहास कांदे यांचं मत बाद
शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत निवडणूक आयोगाने बाद ठरवलं. सुहास कांदे यांनी मतपत्रिका शेजारच्या दुसऱ्या पक्षाच्या एका प्रतिनिधीला दाखवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. मतपत्रिका त्यांना नेमून दिलेल्या एजंटच्या जागेच्या बाहेर येऊन दाखवला. निवडणूक अधिकाऱ्यांनी वारंवार बजावून देखील ते मतपत्रिका घेऊन दुसऱ्या क्युबिकलकडे जात होते. तिथून त्यांची मतपत्रिका दिसत होती.
अन् नऊ तासांनी मतमोजणीला सुरुवात झाली
राज्यसभा निवडणुकीसाठी काल 10 जून रोजी मतदान झालं. सकाळी 9 ते 4 अशी मतदानाची वेळ होती. त्यानंतर मतमोजणी सुरु होऊन सात वाजता निकाल लागणं अपेक्षित होतं. पण जवळपास नऊ तासांनंतर मतमोजणी सुरु झाली. महाविकास आघाडीमधील जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांची मतं अवैध ठरवावीत अशी मागणी करत भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. दिल्लीच्या निरीक्षकांनी याचा अहवाल मागवला होता. हा अहवाल येईपर्यंत मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली होती. अखेर रात्री उशिरा निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचं मत बाद ठरवलं आणि रात्री एक वाजता मतमोजणी सुरु होऊन निकाल जाहीर करण्यात आला. त्यात भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपचे प्रत्येकी तीन उमेदवार विजयी
राज्यसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या तीन आणि भाजपच्या तीन उमेदवारांचा विजय झाला. शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडिक विजयी झाले. मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली. तर शिवसेनेच्या संजय पवार यांना 39 मतं मिळाली, परिणामी 41 मतं मिळवलेल्या भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला.