Pune Husband wife died: पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेदरम्यान पती-पत्नीचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
Pune Husband wife died: शस्त्रक्रियेनंतर बापू कोमकर यांचा दोन दिवसांतच मृत्यू झाला. तर, पत्नी कामिनी कोमकर यांचा मृत्यू आठ दिवसांनी रुग्णालयात झाला.

पुणे: पुण्यातून अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. डेक्कन परिसरातील प्रसिद्ध सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कोमकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मृत्यू पावलेले दाम्पत्य म्हणजे बापू बाळकृष्ण कोमकर आणि कामिनी बापू कोमकर असे असून, पत्नी कामिनी यांनी स्वतःचे लिव्हर दान करून पती बापू यांच्यावर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, शस्त्रक्रियेनंतर बापू कोमकर यांचा दोन दिवसांतच मृत्यू झाला. तर, पत्नी कामिनी कोमकर यांचा मृत्यू आठ दिवसांनी रुग्णालयात झाला.
कोमकर यांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप
या घटनेनंतर कोमकर यांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. सह्याद्री हॉस्पिटल आणि संबंधित डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केला, त्यामुळेच पती-पत्नीचा बळी गेला, असा नातेवाईकांचा दावा आहे. याप्रकरणी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाविरोधात आणि संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. नातेवाईकांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर कामिनी कोमकर व्यवस्थित होती, खात-पित होती. मात्र, अचानक आठ दिवसांनी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आईचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही, अशी नाराजीही नातेवाईकांनी व्यक्त केली.
वैद्यकीय उपचारातील हलगर्जीपणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली
तसेच, कोमकर कुटुंबाने या शस्त्रक्रियेसाठी कर्ज काढून, व्याजाने पैसे उभे केले होते. सुरक्षित शस्त्रक्रियेचे आश्वासन देऊनही दोघांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या मुलावर दुहेरी आघात झाला आहे. आई-वडील गमावल्याने लहान मुलगा पूर्णपणे पोरका झाला आहे.या घटनेमुळे सह्याद्री हॉस्पिटल आणि संबंधित डॉक्टरांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वैद्यकीय उपचारातील हलगर्जीपणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, नातेवाईकांनी न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला आहे. अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कोमकर यांच्या नातेवाईकांनी सह्याद्री हॅास्पिटलवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. सह्याद्री हॅास्पिटल आणि तेथील डॅाक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केला. त्यामुळेच कोमकर पती पत्नीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. पती बारु कोमकर यांचा शस्रक्रियेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला तर, पत्नी कामिनी कोमकर यांचा काल सह्याद्री रुग्णालयात मृत्यू झाला आहे. कामिनी कोमकर यांनी पती बापु कोमकर यांना स्वतःचे लिव्हर दान केले होते. लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया मागील आठवड्यात बुधवारी झाली. त्यानंतर दोनच दिवसात म्हणजे शुक्रवारी बापु कोमकर यांचा मृत्यू झाला. तर, बरोबर आठ दिवसांनी म्हणजे काल (शनिवारी) कामिनी कोमकर यांचा मृत्यू झाला. सह्याद्री हॅास्पिटलचे व्यवस्थापन आणि संबंधित डॅाक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कोमकर यांच्या नातेवाईकांनू केली आहे.























