एक्स्प्लोर
पतंगाच्या मांजामुळे गळा चिरुन पुण्यात महिला डॉक्टरचा मृत्यू
उड्डाणपुलावर लटकणाऱ्या मांजामुळे गळा कापून दुचाकीस्वार डॉक्टर कृपाली निकम यांचा मृत्यू झाला.

पिंपरी चिंचवड : इतरांची पतंग उडवण्याची हौस पुण्यातील 26 वर्षीय महिला डॉक्टरच्या जीवावर बेतली. उड्डाणपुलावर लटकणाऱ्या मांजामुळे गळा कापून दुचाकीस्वार डॉक्टर कृपाली निकम यांचा मृत्यू झाला. नाशिक फाटा परिसरात रविवारी संध्याकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कृपाली यांना मैत्रिणीला सोडण्यासाठी पुणे स्टेशनला जायचं होतं. त्यासाठी मित्राची अॅक्टिव्हा घ्यायला त्या पिंपळे सौदागरहून भोसरीला येत होत्या. नाशिक फाटा परिसरातील उड्डाणपुलावर लटकणारा मांजा गळ्याला लागून कृपाली यांना जखम झाली आणि मोठा रक्तस्राव झाला. त्यांना जवळच्या संत ज्ञानेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. उड्डाणपुलावर मांजा कसा आला, कोण पतंग उडवत होतं, निष्काळजीपणामुळे ही घटना घडली की जाणूनबुजून याचा शोध घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पतंग उडवण्यासाठी चिनी, नायलॉन मांजाचा वापर करु नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं. मकरसंक्रांतीच्या काळात मांजामुळे गळा चिरुन प्राण गमवावे लागल्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे आपली हौस इतरांच्या जीवावर बेतत नाही ना, याची काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
आणखी वाचा























