Pune Weather Update : रात्रीही पुणेकरांच्या जीवाची लाही लाही; रात्रीचं तापमान वाढलं!
हवामान विभागाकडून मंगळवारी राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असतानाच, पुण्यातही तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे : हवामान विभागाकडून मंगळवारी राज्यात उष्णतेच्या लाटेचा (Pune Tempreture) इशारा देण्यात आला असतानाच, पुण्यातही तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसाच्या तापमानासोबतच रात्रीच्या तापमानातही लक्षणीय वाढ झाली असून, शिवाजीनगर येथे रात्रीचे तापमान तब्बल 27.3 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सरासरीपेक्षा हे तापमान 3 ते 4 अंशांनी जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
कमी पाऊस आणि एल निनो परिस्थिती यामुळे यंदा पुण्यात उन्हाच्या झळा जास्त प्रमाणात अनुभवयाला मिळाल्या. एप्रिलमध्ये कडक उन्हाचा अनुभव घेतल्यानंतर मे महिन्याची सुरुवातही काहीशी उष्ण होती. मात्र 10 मे नंतर शहरात सुरू झालेल्या पावसाच्या सत्राने वातावरणात काही अंशी गारवा निर्माण झाला होता. या काळात पुण्यात दिवसा गरम आणि दुपारी ढगाळ वातावरण आणि पाऊस अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव पुणेकर घेत आहेत. अशातच आता हवेतील आद्रता वाढल्यामुळे शहरात दिवस आणि रात्रीच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली असल्याचे हवामान विभगाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
विभगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शिवाजीनगर येथे मंगळवारी ( दि. 21) रोजी दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. हे तापमान सरारीपेक्षा 4.3 अंशांनी जास्त होते. तर रात्री तापमान 27.3 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासात रात्रीच्या तापमानात तब्बल 2.3अंशानी वाढ झाली असून, बुधवारी नोंदविण्यात आलेले हे तापमान गेल्या 10 वर्षातील अर्थात 2013 नंतरचे सर्वात उच्चांकी रात्रीचे तापमान आहे.
दिवसा वाढलेले तापमान, हवेतील आद्रता आणि ढगांची निर्मिती यामुळे उष्णतेचे परावर्तन न होता, ती जमिनीत तशीच साठून राहते, यामुळे रात्रीच्या तापमान लक्षणीय वाढ होत असून, त्यामुळे नागरिकांना रात्री देखील उष्णतेचा फटका बसत आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या, हवामान पूर्वानुमान विभागाचे माजी विभागप्रमुख अनुपम काश्यपी यांनी दिली. तसेच पुढील 2-3दिवस पुण्यासहित संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी उष्णतेच्या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
इतर महत्वाची बातमी-
पुण्यात 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार; पाणी जपून वापरण्याचं आवाहन