Pune Train Fire: पुण्यात डेमू ट्रेनच्या डब्यात लागली आग, प्रचंड धूर अन् प्रवाशांची पळापळ
Pune Train Fire : दौंड येथून पुण्याकडे येणाऱ्या DEMU रेल्वेच्या एका डब्यात अचानक आग लागल्याची घटना घडली.

Pune Train Fire : दौंडहून पुण्याला येणाऱ्या डेमू (DEMU) ट्रेनमध्ये सोमवारी सकाळी एक थरारक घटना घडली. सकाळी 07:05 वाजता दौंडवरून निघालेल्या शटल ट्रेनच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेमुळे ट्रेनमध्ये काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
डेमू (DEMU) ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आग लागली त्याचवेळी एक प्रवासी आत होता. दुर्दैवाने दरवाजा लॉक झाल्यामुळे तो बाहेर पडू शकत नव्हता. काही वेळातच टॉयलेटमधून धूर बाहेर येऊ लागला आणि आतमधील व्यक्तीचा आरडा-ओरडा ऐकू येऊ लागला. हे लक्षात येताच गाडीत असलेल्या काही सतर्क प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्या दरवाज्याकडे धाव घेतली. यानंतर काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांनी दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवण्यात आला.
तातडीने दिली स्टेशन मास्तरला माहिती
घटनेची माहिती प्रवाशांनी तातडीने स्टेशन मास्तरला दिली. आग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागणे ही गंभीर बाब असून रेल्वे प्रशासनाने अशा घटनांना रोखण्यासाठी यंत्रणांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
मुंब्रा रेल्वे अपघातात चार जणांचा मृत्यू
दरम्यान, मध्य रेल्वेवरील (Central Railway Train Accident) मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी (दि. 9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना (mumbai local train accident) घडली होती. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना फुटबोर्डवर लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगा घासल्या आणि काही प्रवाशी रेल्वे ट्रॅकवर कोसळले होते. या दुर्घटनेत चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 9 प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात चौकशी सरु असल्याने या घटनेची ज्यांना माहिती आहे त्यांनी त्यांच्याजवळील माहीती रेल्वेच्या अधिकाऱ्यांना द्यावी असे मध्य रेल्वेने प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























