(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune : अॅपल वॉचमुळे पुण्यातील तरुणाचा जीव वाचला अन् त्यानं थेट टीम कूकला मेल केला; नेमकं काय घडलं?
पुण्याच्या एका तरुणाने आपला जीव वाचण्याचं श्रेय अॅपल वॉचला दिलं आहे. त्याने टीम कूक याबाबत ई-मेलवर सांगितलं आणि कूक यांनी देखील या मेलची दखल घेत स्मितच्या मेलला रिप्लायदेखील केला आहे.
Apple Watch tim Cook : अॅपलच्या वॉचमुळं पुण्यातील एका तरुणाचा जीव वाचला. हो हे खरंय... पुण्याच्या एका तरुणाने आपला जीव वाचण्याचं श्रेय अॅपल वॉचला दिलं आहे. स्मित मेथा असं त्या तरुणाचं नाव आहे. त्याने त्याच्यासोबत घडलेल्या अपघाताची माहिती अॅपलचे सीईओ टीम कूक यांना ई-मेलवर सांगितली आणि कूक यांनी देखील या मेलची दखल घेत स्मितच्या मेलला रिप्लाय देखील केला आहे. तुमच्यासोबत घडलेला अपघात भयंकर होता. तुम्ही लवकरच बरे व्हाल. हा अपघाताची आपबीती आमच्याशी शेअर केल्याबद्दल धन्यवाद, असं त्यांनी या तरुणाच्या मेलच्या रिप्लायमध्ये लिहिलं आहे.
त्याचं झालं असं 17 वर्षीय स्मित त्याच्या तीन मित्रांसह लोणावळ्याजवळ ट्रेकला गेला होता. त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. ट्रेक छान पार पडला. गडावर पोहोचले आणि फोटो काढले आणि परतीच्या वाटेला लागलो. पण परतीच्या वाटेवर ट्रेकच्या शेवटी मुसळधार पावसामुळे मी घसरलो आणि दरीत पडलो, असं तो सांगतो. ती दरी फार खोल होती. 130 - 150 मीटर खोली असेल. एका झाडाच्या साहय्याने तो अडकला होता. त्यामुळे त्याला फारशी दुखापत झाली नाही.
ट्रेकला गेल्यामुळे सगळ्या मित्रांनी एक बॅगमध्ये आपले मोबाईल ठेवले होते. त्यामुळे घसरताना त्याच्या खिशात मोबाईलदेखील नव्हता. त्यावेळी त्याच्या हाताला अॅपलचं वॉच होतं आणि ते वॉच नेटवर्कशी जोडलं गेलं होतं. त्याने या वॉचच्या कॉलिंग फिचरचा वापर केला. यामुळे वॉच वापरकर्त्यांकडे त्यांचा फोन नसतानाही त्यांना कॉल करता येतो. त्याने ट्रेकला सोबत आलेल्या मित्रांना आणि कुटुंबियांना फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी त्याच्या फोननंतर बचाव पथकांशी संपर्क साधला. स्मित अडकलेल्या ठिकाणावरुन त्याला उचलल्यानंतर बचाव पथकांनी लोणावळ्यातील स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. नंतर त्याला पुण्यातील ऑर्थोपेडिक रुग्णालयात हलवण्यात आले. "माझे दोन्ही पाय सुजले होते त्यामुळे सर्जन शस्त्रक्रिया करू शकले नाहीत. मात्र काही दिवसांनी म्हणजेच 16 जुलै 2022 रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली, असं स्मितने सांगितलं.
जीव वाचला अन् त्याने थेट कूकला मेल केला
या सगळ्यातून बरा झाल्यावर स्मितने थेट अॅपलचे सीईओ टीम कूक यांना मेल करायचा निर्णय घेतला. त्याने कूक यांना घडलेला प्रकार आणि बचाव कसा झाला? हा किस्सा लिहिला आणि त्यांचे आभार देखील मानले. त्या मेलची कूक यांनी दखल घेतली आणि त्यांनी देखील त्याला रिप्लाय केला आणि तुमच्यासोबत घडलेला अपघात भयंकर होता. तुम्ही लवकरच बरे व्हाल. हा अपघाताची आपबीती आमच्याशी शेअर केल्याबद्दल धन्यवाद, असं मेलमध्ये लिहिलंय.