Pune: ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणी सरकारला अखेर जाग, ललित पाटील कसा पळाला याची चौकशी करण्यासाठी समिती गठीत
Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटील प्रकरणी राज्य सरकारने चार सदस्यीय समिती तयार केली असून त्यांना 15 दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
पुणे: ड्रग माफिया ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून (Sasoon Hospital Drug Racket Case) पळून जाऊन आठ दहा दिवस उलटल्यानंतर राज्य सरकारला जाग आल्याचं दिसतंय. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय राज्याचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी घेतला आहे. या समितीला 15 दिवसांमध्या त्यांचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.
राज्य सरकारच्या या चौकशी समितीत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सोलापूरच्या शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेडच्या न्यायवैद्यक शास्रविभागाचे प्रमुख डॉ. हेमंत गोडबोले आणि मुंबईतील ग्रॅट महाविद्यालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. एकनाथ पवार यांचा समावेश आहे.
ससूनच्या कारभारावर टीका
ललित पाटीलवर (Lalit Patil) एकूण सहा डॉक्टर उपचार करत होते. मात्र त्याला कोणते आजार होते, त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची नावे काय आहेत आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय कधी घेण्यात आला याबाबत ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांनी कोणालाही माहिती दिलेली नाही. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माहिती मागितल्यावर देखील डीन डॉ. संजीव ठाकूर यांनी त्यांना माहिती दिलेली नाही. ही माहिती आपण न्यायालयात दिली आहे एवढं एकच उत्तर त्यांच्याकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे ससूनच्या कारभारावर टीका होत आहे.
दादा भुसे यांच्यावर थेट आरोप
ड्रग्ज माफिया ललित पाटील यांना ससूनमधून पळून जाण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी मदत केल्याचा थेट आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. ललित पाटीलला ससूनमध्ये भरती करण्यासाठी दादा भुसे यांनी कॉल केल्याचा आरोप करत दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्या आधी पुणे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकरांनीही ललित पाटील प्रकरणी राज्य सरकारच्या मंत्र्याचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.
ललित पाटील नेपाळला पळून गेल्याचा संशय
ड्रग माफिया ललित पाटील नेपाळमध्ये पळून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मेफेड्रोन विक्रीच रॅकेट चालवत असल्यानं ललित पाटीलचे देशातील आणि देशाबाहेरील अनेक ड्रग्ज माफियांशी आधीपासूनच संबंध आहेत. त्याचाच आधार घेऊन ललित पाटीलने नेपाळमध्ये आश्रय घेतला असण्याची शक्यता आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नेपाळ सीमेवर अटक केली मात्र ललित पाटील पुणे पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरला आहे.
ही बातमी वाचा: