(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune River News : नदीपात्रात सापडलेल्या शंकराच्या प्राचीन पिंडीबाबत इतिहास अभ्यासक काय सांगतात?
पुण्यात नदी सुधार प्रकल्पाचं काम सुरु झालं आहे. त्यासाठी पुण्यातील मुळा मुठा नदीपात्राच्या परिसरात खोदकाम करण्यात येत आहे. पुण्यातील संगमवाडी परिसरातील मुळा-मुठा नदीचा संगम असलेल्या ठिकाणी खोदकाम सुरु असताना 250 वर्ष जुनी शंकराची पिंड सापडली आहे.
Pune River News : पुण्यात नदी सुधार प्रकल्पाचं काम सुरु झालं आहे. त्यासाठी पुण्यातील मुळा मुठा नदीपात्राच्या परिसरात खोदकाम करण्यात येत आहे. पुण्यातील संगमवाडी परिसरातील मुळा-मुठा नदीचा संगम असलेल्या ठिकाणी खोदकाम सुरु असताना 250 वर्ष जुनी शंकराची पिंड सापडली आहे. यासोबतच ब्रिटीशकालीन धातूची बंदूक आढळली आहे. त्यामुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. या नदीपात्रात शंकराची पिंड सापडलेल्या ठिकाणी पूर्वी नेमकं काय होतं?, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
या शिवलिंगासंदर्भात सांगताना अभ्यासक समीर निकम म्हणाले की, "या खोदकामादरम्यान सापडलेले शिवलिंग प्राचीन आहेत. काही अंतरावरच संगमेश्वर मंदिर होतं. 1962 मध्ये हे मंदिर पूराच्या पाण्यात वाहून गेलं होतं. त्याच मंदिराचे हे अवशेष आहेत. साधारण 250 ते 300 वर्ष जुने हे शिवलिंगाचे अवशेष आहे." "त्यासोबत पितळेची बादली देखील सापडली आहे," असं ते सांगतात.
नदी सुधार प्रकल्पाच्या कामाचं खोदकाम सुरु आहे. त्यादरम्यान हे अवशेष सापडले आहेत मात्र मागील अनेक वर्षांपासून समीर निकम आणि इतिहास अभ्यासक मंदार लव्हाटे हे अवशेष शोधण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र नदी सुधार प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी हे अवशेष शोधण्यात मदत करणार असल्याचं अभ्यासकांना सांगितलं. त्यामुळे रोज खोदकामादरम्यान या अवशेषांकडे लक्ष ठेवलं जात आहे.
ज्या ठिकाणी नदीचा परिसर असतो किंवा जुने पाणवठे असतात. त्या ठिकाणी मंदिरं वगैरे असतातच. नदी सुधार प्रकल्पाच्या कामाचं खोदकाम करताना जुना इतिहास समोर येणार आहे. त्यामुळे या सगळ्या अवशेषांकडे पुणे महानगरपालिकेने लक्ष देणं गरजेचं असल्याचं समीर निकम यांनी म्हटलं आहे. या खोदकामादरम्यान पिस्तुलही सापडली आहे. ही पिस्तुल जमिनीपासून प्रचंड खोलवर सापडली आहे. ही पिस्तुल वजनदार आहे. या परिसरात अनेक वर्षांपूर्वी ब्रिटीश रेसिडेन्सी होती. त्यामुळे ही पिस्तुल त्याच काळातली असू शकते असा साधारण अंदाज बांधण्यात येत आहे. ही पिस्तुल सध्या पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे.
पुरात्तव विभागाकडे अशा प्रकारचे अनेक अवशेष सापडू शकतात असं सांगतून त्यांच्याकडे मागील 15 वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. मात्र अजूनही पुरातत्व विभागाचे अधिकारी अवशेष सापडलेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले नाहीत. हे सगळे सापडलेले अवशेष इतिहास संशोधक मंडळाकडे सुपूर्द करत असल्याचं निकम यांनी सांगितलं आहे.
येत्या काळात इतिहास उलगडणार
नदी सुधार प्रकल्पाचं काम संपूर्ण नदीपात्रात होणार आहे. त्यासाठी खोदकामदेखील प्रत्येक परिसरात करण्यात येणार आहे. त्यामुळे खोदकामादरम्यान सापडलेल्या अवशेषांमुळे नवा इतिहास उलगडण्याची शक्यता आहे.