पुण्यात निवृत्त पोलीस निरीक्षकाने दारुच्या नशेत गाडी चालवत पाच जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
पोलिस निरीक्षक म्हणून काम केलेल्या एका अधिकाऱ्याने असं कृत्य केल्याने सर्व स्तरांतून टीका होत असून कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
पुणे : पुण्यातील निवृत्त पोलिस निरीक्षकाने दारू पिऊन गाडी चालवत 5 जणांना चिरडलं आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील चतुर्शिंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना घडली आहे. संजय निकम असं या निवृत्त पोलिस निरीक्षकाचं नाव आहे.
पुण्यातील चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन हद्दीतील बाणेर परिसरात काल भरदुपारी हा अपघात झाला. मद्यधुंद अवस्थेतील सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाने बेदरकारपणे गाडी चालवत दुचाकीस्वाराला उडवत 100 मीटर फरफटत नेले. त्यानंतर याच भरधाव गाडीने पंक्चरच्या दुकानात घुसून तेथील तीन जणांना उडवून जवळच थांबलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात एका नागरीकाचा जागीच मृत्यु झाला.
हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी निवृत्त पोलीस निरीक्षकाला ताब्यात घेतलं आहे. आरोपी संजय निकम याची वैद्यकीय चाचणी केली असताना त्याने मद्य प्यायलं असल्याचं स्पष्ट झालं.
पोलिस निरीक्षक म्हणून काम केलेल्या एका अधिकाऱ्याने असं कृत्य केल्याने सर्व स्तरांतून टीका होत आहे. या अपघातात एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेलाय तर 4 जण गंभीर जखमी आहेत, त्यामुळे निवृत्त पोलिस निरीक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.