पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीरावांचे नाव द्या; भाजप खासदार मेधा कुलकर्णींची मागणी
पुणे शहरातील रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे.

पुणे: देशात भाजपचे सरकार आल्यानंतर नामांतरणाची मोहीम गतीमान झाली असून शहरांसह अनेक जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचेही नामांतर करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबादचं नाव प्रयागराजचं करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही दोन शहरांची नावे बदलली आहेत. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्यात आलं आहे. त्यासोबतच, आता अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झालं आहे. त्यामुळे, जनभावनांचा आदर करत हे नामांतर करण्यात आल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात आलं. आता, पुणे (Pune) शहरातील रेल्वे स्थानकाचे (Railway) नामांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपा खासदार मेधा कुलकर्णी (Medha kulkarni) यांनी ही मागणी केली आहे.
पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीला त्या त्या जिल्ह्यातील सर्व खासदार उपस्थित होते. पुणे रेल्वे स्टेशन आणि पुणे शहरासंबंधीत प्रश्न मी या बैठकीत उपस्थित केले. यातील एक मुद्दा होता तो म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशा प्रकारची मागणी अनेक संघटनांनी वेळोवेळी केली आहे. आजच्या बैठकीत मी त्याचा पुनरुचार केला आहे. कुठल्याही रेल्वे स्थानकाचा, विमानतळाचा भारतातील त्याच्या इतिहासाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून नागरिकांनाही आपला दैदिप्यमान इतिहास कळाला पाहिजे. परंतु, पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाही. पुणे शहर हे मोठे आहे नावाजलेले आहे राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही. शिक्षणाचे माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे शैक्षणिक शहर आहे, आयटी हब आहे. त्यामुळे इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत म्हणून पुणे रेल्वे स्टेशनला थोरली बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केल्याचे मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं.
कोण आहेत थोरले बाजीराव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचे काम थोरले बाजीराव पेशवे त्यांनी केले आहे. शनिवार वाडा देखील त्याचेच प्रतीक आहे. हिंदवी साम्राज्याचा विस्तार, मराठा साम्राज्याचा विस्तार जसा छत्रपतींच्या काळात झाला तसाच थोरले बाजीराव पेशवे यांनी देखील केला आहे. या कामात बाजीराव पेशवे यांचे देखील योगदान मोठे आहे. थोरले बाजीराव पेशवे 42 लढाया लढले, एकही हरले नाही. एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात. त्यांच्या युद्ध कौशल्याचे धडे सैन्यालाही दिले जातात. छत्रपती शिवरायांचा वारसा त्यांनी चालवला, अटकेपार झेंडा ज्यांनी रोवला अशा थोरल्या बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी केल्याचे मेधा कुलकर्णी यांनी सांगितल.
पुणे शहराला पेशव्यांचा इतिहास
पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांचा मोठा इतिहास आहे. पुण्यातील शनिवार वाडा आजही पेशवे घराण्याच्या इतिहासाची साक्ष देतो. त्यामुळेच, पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगत पुणे जंक्शनचे नामांतर करण्याची मागणी खासदार यांनी केली आहे. श्रीमंत थोरले बाजीराव यांचे नाव देण्याची ही मागणी आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव द्या - खरात
पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्याचे समजत आहे, परंतु या नावाला आमचा विरोध आहे. कारण शिवाजी महाराजांनी राज्य चालविण्यासाठी जी राज्याभिषेक शक निर्माण केली होती, तीच राज्यभिषेक शक बंद करून पेशव्यांनी फसली शक निर्माण केली. तसेच रयतेचे राजे शिवाजी महाराजांची समाधी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधली आणि पुढे जाऊन शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा साजरी केली, आणि याचा उल्लेख तत्कालीन वर्तमानपत्र दिनबंधू यांमध्ये आहे तसेच स्त्री शिक्षणाचा यशस्वी लढा दिला त्यामुळे आमचा पुणे रेल्वे स्थानकाला थोरला बाजीराव पेशवे नाव देण्यास विरोध आहे आणि आमची मागणी आहे की क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव पुणे रेल्वे स्टेशन ला देण्यात यावे, अशी मागणी रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी केली आहे.
हेही वाचा
माझ्या शेतात मी CNG ट्रॅक्टर वापरतो, लवकरच देशात सीएनजीवरील ट्र्रॅक्टर; नितीन गडकरींची घोषणा

























