छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेला बेड्या, पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेला अटक करण्यात आली आहे. 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी ही पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. प्रियदर्शनी निकाळजे मागील वर्षभरापासून पसार होती.
पुणे : गँगस्टर छोटा राजनच्या नावाने 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. प्रियदर्शनी निकाळजे मागील वर्षभरापासून फरार होती. अखेर मंगळवारी (18 मे) पोलिसांनी सापळा रचून तिला बेड्या ठोकल्या.
छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेने मार्च 2020 मध्ये एका व्यक्तीकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. "मी एका राजकीय पक्षाची जिल्हा अध्यक्ष आहे. तसंच गँगस्टर छोटा राजनची पुतणी असून, आमचा डीएनए देखील एक आहे. स्वत:चा जीव प्रिय असेल तर 50 लाख रुपये दे," असं धमकावत तिने खंडणी मागितली होती.
याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सापळा रचला आणि 25 लाखांची खंडणी स्वीकारताना धीरज साबळे याला रंगेहाथ पकडलं होतं. तर चौकशीअंती मंदार वाईकर याला अटक केली होती. परंतु यातील मुख्य आरोपी प्रियदर्शनी निकाळजे मात्र पसार झाली होती.
दरम्यान खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना काल प्रियदर्शनी निकाळजे वानवडी परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिला सापळा रचून अटक केली. कोर्टात हजर केल्यानंतर तिला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.