(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PUNE : अवैधरित्या सावकारी करणाऱ्या दिग्दर्शकाला अटक
तक्रारदार रावेतमधील खासगी रुग्णालयात पीआरओ म्हणून गेली सहा वर्षापासून काम करतात. दरम्यान त्यांना व त्यांच्या पत्नीला आजार झाला होता.
पुणे : अवैधरित्या सावकारी करणाऱ्या दिग्दर्शक व नाट्य लेखकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. त्याने रावेतमधील खासगी रुग्णालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणाऱ्या तरुणाकडून व्याजापोटी लाखो रुपये घेतले आहेत. खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. याप्रकरणी शंतनू वसंत पांडे (वय 45, रा. वारजे) असे अटक केलेल्या या दिग्दर्शक व नाट्य लेखकाचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रविराज साबळे (वय 36) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारदार रावेतमधील खासगी रुग्णालयात पीआरओ म्हणून गेली सहा वर्षापासून काम करतात. दरम्यान त्यांना व त्यांच्या पत्नीला आजार झाला होता. त्याला महिना 28 हजार रुपये खर्च येत होता. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यांना पैश्यांची आवश्यकता असल्याने त्यांनी 2018 मध्ये मित्राकडे पैसे मागितले. तर सांगवी येथील एका मित्राने त्यांना शंतनू पांडे हा व्याजाने पैसे देत असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी पांडे याची भेट घेतली. त्याने मागितले. पांडे पैसे देण्यास तयार झाला. त्यानंतर हमी करारनामा करत हात उसने म्हणून 6 लाख रुपये 5 टक्के व्याजाने पैसे दिले होते. त्या बदल्यात फिर्यादी यांनी त्याला व्याज व मुद्दल असे 7 लाख 40 हजार रुपये दिले होते. तरीही तो फिर्यादी यांच्याकडे 7 लाख 20 हजार रुपये देण्यासाठी मागत होता. तसेच त्याने पैसे न दिल्यास शिवीगाळ करत व कुटुंबाला त्रास देईल असे धमक्या देत. तर दररोज 2 हजार रुपये द्यावे लागतील अश्या धमक्या देत होता.
याबाबत रविराज यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने गुन्हा दाखल करत पांडे याला अटक केली आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याची माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. पांडे याचे हिंदी चित्रपट दिग्दर्शक व नाट्य लेखक असल्याचे प्रोफाइल आहे. त्याबाबत अधिक माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.