Womens day Vandana Khemse : दुबईतील बॉडीगार्डची नोकरी सोडली अन् मुलींच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवायला भारतात परतल्या; तळेगावच्या वंदना केमसेंची धाडसी कहाणी
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे गावातील किंवा मावळ तालुक्यातील किमान 600 मुलींची छेडछेडीपासून सुटका केली, असं तळेगाव दाभाडे गावात बॉडीगार्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदना खेमसे सांगतात.
Womens day Vandana Khemse : "2008 मध्ये तळेगाव दाभाडे गावातील एका उच्चभ्रू घरातील मुलीने आत्महत्या केली होती. त्यावेळी तिने का थेट आत्महत्येचं पाऊल उचललं याची खोलवर जाऊन चौकशी केली. तर त्यामुलीने छेडाछेडीतून आत्महत्या केली होती. हे सगळं पाहून मी हादरले आणि मुलींच्या सुरक्षेसाठी काहीतरी करावं असा निर्णय घेतला. सरसनेपती उमाबाई दाभाडे ब्रिगेड ही संस्था सुरु केली आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे गावातील किंवा मावळ तालुक्यातील किमान 600 मुलींची छेडाछेडीपासून सुटका केली," असं तळेगाव दाभाडे गावात बॉडीगार्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदना केमसे सांगतात.
वंदना खेमसे या पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे गावात राहतात. त्यांचं वयाच्या 14 व्या वर्षी लग्न झालं त्यानंतर लगेच वर्षभरात मुलगी झाली. शरीरयष्ठी धिप्पाड असल्याने त्यांनी लग्नानंतर पुढचं शिक्षण घेऊन नोकरी करण्याचा निर्णय घेतला. दहावी, बारावी केली आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनला अॅडमिशन घेतली. त्याच दरम्यान त्यांना दुबईतून सिक्युरीटी ऑफिसरची ऑफर आली. त्यांनी तीन वर्ष दुबईत काम केलं. मात्र शरीरयष्ठीचा वापर हा फक्त पैसे कमवण्यासाठी नाही तर अन्याय आणि अत्याचार दूर करण्यासाठी करु शकतो, असं लक्षात आल्यावर त्यांनी थेट नोकरी सोडून भारत गाठलं. त्यांनी भारतात त्याचं पुढचं शिक्षण घेतलं.
कशी झाली सुरुवात?
2008 मध्ये तळेगाव दाभाडे गावातील एका उच्चभ्रू घरातील मुलीने आत्महत्या केली होती. त्यावेळी मी तिने का थेट आत्महत्येचं पाऊल उचललं याची खोलवर जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्या मुलीचा मागील अनेक दिवसांपासून शारिरीक छळ केला जात आहे. त्यावेळी जर गावातील प्रतिष्ठित घराण्याची मुलीची छेड काढली जात असेल तर बाकी मुलींचं काय? असा विचार मनात आला आणि मी सरसेनापती उमाबाई दाभाडे ब्रिगेड ही संस्था सुरु केली. त्यासंस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 600 पेक्षा अधिक मुलींना मदत केली आहे आणि त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळापासून बचाव केला आहे.
हे काम नेमकं कसं चालतं?
सध्या महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या छेडाछेडीची प्रकरणं वाढत आहे. रोज नवे प्रकरणं समोर येतात. त्यामुळे मुलींच्या मानसिक आणि शारीरीक आरोग्यावर परिणाम होतो. अनेकदा गावातील मुली अशी प्रकरणं कुटुंबियांना सांगू शकत नाहीत किंवा कुटुंबियांची बदनामी होईल म्हणून पोलिसांत जाऊ शकत नाहीत अशा मुलींना वंदना मदत करतात. छेडछाड करणाऱ्या मुलांची त्या भेट घेतात. त्यांना समजावून सांगतात. मुलाने ऐकलंच नाही तर त्याला योग्य तसा धडा शिकवतात. आतापर्यंत त्यांनी अनेक मुलींचा या शारिरीक छळापासून आणि छेडाछेडीपासून बचाव केला आहे.
आईकडून प्रेरणा
या सगळ्या कामाची प्रेरणा मी माझ्या आईकडून घेतली आहे. माझं लहान वयात झालेलं लग्न, त्यानंतर मुलगी आणि त्यानंतर शिक्षण असा आयुष्याचा उलटा प्रवास तिने जवळून पाहिला आहे. आई बालवाडी शिक्षिका होती. तिने डोंगरी संघटनेत काम केलं आहे. तिच्याकडून कामाचा वारसा मिळाला आहे. तिच्यामुळे मला हे काम करायची प्रेरणा मिळाली, असं त्या सांगतात.