Ajit Pawar: दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची अजित पवारांकडून गंभीर दखल
Ajit Pawar: पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पुणे: पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने (Dinanath Mangeshkar Hospital) रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली.दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या रूग्णालयाच्या समोर आंदोलन केलं जात आहे. त्याचबरोबर या रूग्णालयाची या घटनेनंतर चौकशी सुरू आहे. अशातच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तज्ञांची समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर आता त्यांचा अहवालही समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाने तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचे म्हणणे मांडले असले, तरी शासन या प्रकरणाचा सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल. या घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या आहेत. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवारांनी या प्रकरणी सोशल मिडिया एक्सवरती पोस्ट शेअर केली आहे.
काय म्हटलंय पोस्टमध्ये?
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं श्रीमती तनिषा भिसे या भगिनीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनानं घेतली आहे. आरोग्य विभागानं तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीनं, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनानं त्यांचं म्हणणं मांडलं असलं तरी, संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनानं समजून घेतल्या असून चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं, ही विनंती.
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं श्रीमती तनिषा भिसे या भगिनीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनानं घेतली आहे. आरोग्य विभागानं तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 4, 2025
नेमकं काय घडलं?
पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही.
परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.
























